वृत्तसंस्था, मुंबई
चीनचं टीयाँगाँग स्पेस स्टेशन उद्या, म्हणजेच सोमवारी पहाटे पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता आहे. धक्कादायक बाब म्हणजे या स्टेशनच्या मार्गात मुंबईसह महाराष्ट्राचा बराचसा भाग येतो. हे स्पेस स्टेशन स्कूल बसच्या आकाराचे आहे. मात्र खाली कोसळताना त्याचे लहान तुकडे होऊ शकतात. या तुकड्यांमध्ये विषारी वायू असण्याची शक्यता असल्यानं कोणीही त्याला हात लावू नये, असं आवाहन करण्यात येतंय.
या स्पेस स्टेशनच्या संभाव्य मार्गात मुंबईसह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर अशा पट्ट्याचा समावेश आहे. मात्र, त्याचा वेग पाहता, ते नेमकं कुठं पडेल, याचा अंदाज बांधणं आता तरी कठीण आहे. उद्या पहाटे चार वाजून 55 मिनिटांनी या स्पेस स्टेशननं म्हणजेच प्रयोगशाळेनं पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर परिसराबाबत अंदाज बांधता येईल. 2011 मध्ये हे स्पेस स्टेशन लाँच करण्यात आले होते. मात्र, 2016 मध्ये चीनचा त्याच्याशी संपर्क तुटला. तेव्हापासून ते अंतराळात कुठल्याही नियंत्रणाशिवाय फिरत आहे.