नियतीचा खेळ कोणीही सांगू शकत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिक येथे घडला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या मजूर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. खंडवा येथून एकलहरे येथे वीटभट्टीवर मातीकाम करण्यासाठी आलेल्या कष्टकरी आई-बापाची आपल्या अवघ्या तेरा महिन्यांच्या पोटच्या गोळ्यावरील नजर हटली आणि एक धक्कादायक घटना घडली.
आई-वडील वीटभट्टीवर काम करत असताना पोटच्या चिमुकल्याचा पाण्याच्या खड्ड्यात पडल्याने मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना एकलहरे गेटवरील प्रकाश राऊत यांच्या वीटभट्टीवर घडली. मयत झालेल्या प्रतीकचे आई-वडील वीटभट्टीवर मातीकाम करतात. त्यांचा प्रतीक हा अवघा तेरा महिन्यांचा मुलगा ते काम करीत असलेल्या ठिकाणीच रांगत, खेळत असे.वीटभट्टीवर जवळच त्याला ठेवून त्याचे आई-वडील विटांचे आणि मातीचे ढिगारे उपसण्याचे काम करीत असताना, अधूनमधून प्रतीककडे दोघे लक्ष देत असत.
शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे प्रतीक त्याचे आई-वडील काम करीत असलेल्या ठिकाणी जवळच रांगत होता. त्याचे आई-वडीलही माती उपसण्याच्या कामात व्यस्त झाले अन् काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. लहानगा प्रतीक रांगत रांगत जवळच विटकामासाठी पाणी साठवून ठेवलेल्या खड्ड्याकडे गेला आणि खड्ड्यातील पाण्यात पडला.
बेशुद्ध प्रतीकला त्यांनी पालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉ. चव्हाण यांनी प्रतीकला मयत झाल्याचे घोषित केल्याने त्याच्या कष्टकरी पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.