छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीवरील सामूहिक अत्याचाराच्या एका गंभीर गुन्ह्यात खुद्द पीडितेची आईच आरोपीला संरक्षण देत केवळ त्याच्या बाजूने उभी राहिली नाही, तर तिने आपल्या मुलीला सोडून थेट त्याच गुन्हेगार तरुणासोबत लग्नगाठ बांधली. हा विकृत प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित तरुणीने वडिलांसह पोलीस ठाणे गाठून आई आणि आरोपी अशा दोघांविरुद्ध कठोर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोघांनाही अटक केली आहे.
पीडित, आता 18 वर्षांची झालेली तरुणी, वडिलांसोबत पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने ३ वर्षांपूर्वीच्या भयानक अत्याचाराची कहाणी सांगितली. ती अल्पवयीन असताना एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केला होता. पण, या भयाण घटनेनंतर तिच्या आईने घेतलेल्या भूमिकेने सर्वांनाच स्तब्ध केले. आईने आरोपीला केवळ आश्रय दिला नाही, तर 'मी तुझे लग्न त्याच्याशी लावून देईन' असे खोटे आश्वासन देत पीडितेला गप्प बसण्यास भाग पाडले. कालांतराने, या आईने मुलीला सोडून दिले आणि स्वतः त्याच तरुणाशी विवाह केला. लग्न करून दोघे खलीलाबाद शहरात राहू लागले. पीडितेचा आरोप आहे की या जोडप्याने गेल्या तीन वर्षांपासून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला.
या प्रकरणाची पाळेमुळे 2011 पासून सुरू झाली आहेत. तेव्हा पीडितेच्या आईनेच या आरोपी तरुणाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून, आरोपींविरोधात अटक वॉरंटही जारी झाले आहे. तरीही, आईने कायद्यापासून फरार असलेल्या आरोपीसोबत लग्न केले. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने अल्पवयीन असताना तिच्यावर अनेकदा बलात्कार केला आणि 'प्रकरण मिटवण्यासाठी' तिच्यावर प्रचंड दबाव आणला. तिने विरोध केल्यावर तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. ती मदतीसाठी आक्रोश करत राहिली, पण आईने तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
या थरारक प्रकरणाला निर्णायक वळण तेव्हा मिळाले, जेव्हा पीडितेचे वडील ऑक्टोबर मध्ये मुंबईतून घरी परतले. वडिलांच्या परतण्यामुळे संधी साधून पीडित मुलगी आरोपीच्या तावडीतून सुटली आणि तिने संपूर्ण हकीकत वडिलांना सांगितली. यानंतर, 27 ऑक्टोबर रोजी दोघांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर गुन्हेगारांनी सूडाने पेटून वडिलांनाच एका जुन्या प्रकरणात अडकवले आणि नोव्हेंबरमध्ये त्यांना अटक झाली. न्यायासाठी धडपडणाऱ्या या तरुणीसाठी हा मोठा आघात होता. मात्र, डिसेंबरमध्ये वडिलांची सुटका झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी व आपल्या पत्नीविरोधात तक्रार दाखल केली.
पीडितेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ पोक्सो कायदा आणि बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. या दोन क्रूर आरोपींना अटक करण्यात आली आहे. आपल्या पोटच्या मुलीला न्याय मिळवून देण्याऐवजी गुन्हेगारालाच जीवनसाथी मानणाऱ्या या आईच्या कृत्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली असून, पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.