Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026: ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने सह्याद्री दुमदुमली; शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा दिमाखदार सोहळा, राज्यभरात जल्लोष

दरम्यान, नागपूरमध्येही सकाळपासूनच ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026: ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने सह्याद्री दुमदुमली; शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा दिमाखदार सोहळा, राज्यभरात जल्लोष

पुणे: सह्याद्रीच्या कड्यांवरून उगवणाऱ्या सूर्यकिरणांसोबत आज स्वराज्याचा अभिमान पुन्हा तेजोमय झाला आहे. अन्यायाविरुद्ध उभा राहण्याची शिकवण देणारे, स्वाभिमान आणि धैर्याचा दीप प्रज्वलित करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचा प्रत्येक कोपरा प्रेरणेने उजळून निघाला आहे. ‘जयंती ही केवळ स्मृती नव्हे, तर संकल्पाची पुनःप्रचिती’ या भावनेने लाखो शिवभक्त आज इतिहासाला अभिवादन करत स्वराज्याच्या मूल्यांना नव्याने जागवत आहेत.

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त शिवनेरी गडावर अभूतपूर्व उत्साह उसळला आहे. लाखो शिवभक्तांनी गडावर हजेरी लावली आहे. ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांच्या साक्षीने आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले आहे.

शिवनेरीवरील मुख्य सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध मान्यवर उपस्थित राहणार असून सकाळी शिवाई देवीची पूजा पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विधीवत संपन्न झाली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक खेळ, मर्दानी खेळ आणि शिवकालीन शौर्यपरंपरेची झलक दाखवणारे सादरीकरण यामुळे गडावर ऐतिहासिक ऊर्जा संचारली आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पडत आहेत. मुख्यमंत्री उपस्थितांना मार्गदर्शन करणार असल्याने सोहळ्याला अधिक औचित्य प्राप्त झाले आहे.

हेही वाचा: Buldhana: बुलढाणामध्ये विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास उघड; शाळेतील बेंच वाहतूक करतानाचा व्हिडिओ व्हायरल

राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेले मावळे आज शिवनेरीच्या पायथ्याशी एकवटले आहेत.शिवप्रेमींच्या एकत्रित सहभागातून हा सोहळा भव्यतेकडे वाटचाल करत आहे. तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे तेज दिसून येत आहे. जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गडावर दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.

दरम्यान, नागपूरमध्येही सकाळपासूनच ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. शहरातील विविध भागांतून शिवप्रेमींच्या मिरवणुका निघाल्या असून सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबवले जात आहेत. जय महाराष्ट्रचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये घराघरांत उत्सवाचे वातावरण असून युवक-युवतींचा सहभाग लक्षणीय आहे. केवळ जल्लोष नव्हे, तर स्वराज्याच्या मूल्यांची जपणूक करण्याचा संदेशही या निमित्ताने दिला जात आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथेही शिवजयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. चित्रकार रवी इंगळे यांनी स्वखर्चाने पाच मजली इमारतीवर तब्बल 55 फूट उंचीची छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा साकारून मानवंदना दिली. या कलाकृतीमुळे परिसरात आकर्षणाचे केंद्र निर्माण झाले आहे. राज्यभरात अशा विविध उपक्रमांतून शिवजयंती केवळ उत्सव न राहता प्रेरणेचा पर्व ठरत आहे. इतिहासाच्या स्मृती जागवत, भविष्याला दिशा देणारा हा दिवस महाराष्ट्राच्या अस्मितेचा दिमाखदार उत्सव ठरत आहे.

हेही वाचा: T20 World Cup: सिक्सर किंग शिवम दुबेचा रुद्र अवतार; 31 चेंडूत 66 धावा अन् दोन विकेट्स, नेदरलँड्सचं वर्ल्ड कपमधून पॅकअप

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number