Chhatrapati Sambhajinagar Water Shortage: लाडक्या बहिणींची पाण्यासाठी वणवण

मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला यंदाचा उन्हाळा जड चालला आहे. पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा पैठण तालुक्यात बसू लागल्या आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Water Shortage: लाडक्या बहिणींची पाण्यासाठी वणवण

विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला यंदाचा उन्हाळा जड चालला आहे. पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा पैठण तालुक्यात बसू लागल्या आहेत. अजून दीड महिना पावसाळ्यासाठी असून एप्रिल मध्यानंतर जिल्ह्यातील जलस्त्रोतांवर वाढत्या तापमानाचा परिणाम झाल्याने टॅंकरची मागणी वाढत आहे. हंडाभर पाण्यासाठी लाडक्या बहिणींची खेड्या पाड्यांत भटकंती सुरु आहे. 

पैठण तालुक्यात रखरखत्या उन्हामध्ये नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पाणी टंचाईचे वास्तव रूप पाहायला मिळत आहे. उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. त्याचप्रमाणे जिवाची काहिली होत आहे. या उन्हाची पर्वा न करता ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करत आहेत. मराठवाड्याची जीवन वाहिनी म्हणून पैठणच्या जायकवाडी धरणाची ओळख आहे. मात्र याच तालुक्यात भीषण पाणीटंचाई आहे. 'धरण उशाला आणि कोरड घशाला' अशी म्हणण्याची वेळ पैठणच्या आडूळ ब्रुद्दूक आणि आडूळ तांडा येथील नागरिकांवर आल्याची पाहायला मिळत आहे. आजच्या स्थितीत या ठिकाणच्या नागरिकांना 60 ते 70 रुपये ड्रम प्रमाणे पाणी विकत घेण्याची वेळ ओढवली आहे. 

पैठणच्या आडूळ बुद्रुक आणि आडूळ तांडा परिसरात पावसाळ्यात कमी झालेले पर्जन्यमान यामुळे हिवाळ्यातच नद्या, ओढे, नाले पाण्यावाचून कोरडेठाक पडले होते. पाझर तलाव, लघु तलाव पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. तर काहींमध्ये शून्य टक्के जलसाठा शिल्लक आहे. एप्रिल महिन्यात विहिरींनी तळ गाठले आहेत. यामुळे जलसाठा शिल्लक नसल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाची पर्वा न करता ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करत आहेत.

हेही वाचा : Nagpur Heatwave: जगातील 'हॉट टेन'मध्ये नागपूर शहराचा समावेश

आडूळ येथील महिलांना पाण्यासाठी सकाळी झोपेतून उठून पाण्याच्या शोधात दूर शेतात पायपीट करावी लागत आहे. डोक्यावर हंडे, घागर, हातात बकेट, काखेत लेकरू असा संघर्ष ग्रामस्थांना करावा लागत असल्याचे बघायला मिळत आहे. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रू देण्यात येतात. परंतु आडूळ येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या लाडक्या बहिणींना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे. लाडक्या बहिणींचे हाल सरकारला दिसत नाहीत का असा सवाल महिलांनी उपस्थित केला आहे.

आडूळ परिसरात दुष्काळी परिस्थिती शेवटच्या टप्प्यात भयावह झाली आहे. सर्वत्रच पाणीटंचाई ही मुख्य समस्या झाली असून यामुळे  बाजारात जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पाणी आणि चारा या दोन्हीही गोष्टी नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. सरकारने लवकर टँकर सुरू करावे, जेणे करून आमच्या गुराढोरांचा पाण्याचा प्रश्न मिटेल, माणसं जगतीलं पण गुरांचं काय असा प्रश्नही गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. सध्या जिल्ह्यात पाणीटंचाई असली तरीही प्रशासनाला त्याचं काही सोयर, सुतक नाही. प्रशासनाने पाणीटंचाई निवारणासाठी तयार केलेला आराखडा फक्त कागदावरच आहे. त्यामुळे टॅंकर सुरू कधी होणार याचीच वाट आता गावा-गावातील नागरिक करत आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number