तमाम भारतीयांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार चांद्रयान-३ यशस्वीपणे चंद्राच्या कक्षेत पोहोचले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या तिसऱ्या चंद्र मोहिमेतील हा अतिशय महत्त्वाचा असा टप्पा होता.
इस्रोने पाठवलेले चांद्रयान-३ हे ४२ दिवसांचा प्रवास करून चंद्रावर पोहोचणार आहे. चंद्राच्या भूमीवर सॉफ्ट लँडिंग हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३चे लँडिंग केले जाऊ शकते. लँडिंग यशस्वी झाल्यानंतर रोव्हर प्रयोगासाठी लँडरमधून बाहेर येईल आणि पुढील ३ ते ६ महिन्याच्या काळात विविध प्रयोग करेल. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार ६ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता चांद्रयानाचे ऑर्बिट कमी केले जाईल. चंद्राच्या भूमीवर उतरण्याआधी एकूण ४ वेळा चांद्रयानचे ऑर्बिट बदलले जाईल.