चंद्रपूरमध्ये उष्णतेचा वाढता कहर; आरटीओ कार्यालयाच्या वेळापत्रकात बदल

चंद्रपूरात उष्णतेची तीव्रता वाढल्यामुळे आरटीओ कार्यालयाच्या वेळेत बदल; 23 एप्रिलपासून नवे वेळापत्रक लागू, उष्माघाताचा धोका टाळण्याचा प्रयत्न.

चंद्रपूरमध्ये उष्णतेचा वाढता कहर; आरटीओ कार्यालयाच्या वेळापत्रकात बदल

चंद्रपूर: उन्हाळ्याच्या झळा चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस तीव्र होत असून, नागरिकांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयाने (प्रादेशिक परिवहन कार्यालय) महत्त्वाचा निर्णय घेत आरटीओद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांच्या वेळेत बदल केला आहे. परिवहन विभागाने 23 एप्रिलपासून या नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी सुरू केली असून, नागरिकांनी वेळेत उपस्थित राहून आपली कामे पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

तापमान 42 अंशांच्या घरात, जनतेला होणारा त्रास टाळण्यासाठी उपाययोजना

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा झपाट्याने चढू लागला आहे. अनेक ठिकाणी तापमान 42 अंशांपर्यंत पोहोचले असून, सकाळीच उन्हाची तीव्रता जाणवू लागते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कामासाठी येणाऱ्या नागरिकांना उष्माघाताचा धोका वाढतो. ही बाब लक्षात घेता, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा :पैठणमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण:फक्त मतांसाठी येऊ नका, पाणीटंचाई दूर करा; सरकारला नागरिकांचा सवाल

सेवांच्या नव्या वेळा कशा असतील?

आरटीओतर्फे देण्यात येणाऱ्या वाहन तपासणी (पासिंग) आणि पक्की अनुज्ञप्ती (ड्रायविंग लायसन्स) चाचणीसाठी नव्या वेळा पुढीलप्रमाणे लागू करण्यात आल्या आहेत:

सकाळची वेळ: सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत
सायंकाळची वेळ: दुपारी ४ ते संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत

या वेळा विशेषतः बाबूपेठ बल्लारपूर बायपास रोडवरील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर होणाऱ्या वाहन तपासणीसाठी आणि कार्यालयात होणाऱ्या पक्क्या अनुज्ञप्ती चाचणीसाठी लागू आहेत.

वाहन 4.0 प्रणालीवरील अर्जदारांनाही सूचना

आरटीओ कार्यालयाने स्पष्ट केलं आहे की, ज्या अर्जदारांनी आधीपासूनच वाहन 4.0 प्रणालीद्वारे वेळ बुक केलेली आहे, त्यांनीही या नव्या वेळेनुसार उपस्थित राहून आपली कामे पार पाडावीत. वेळेच्या बदलामुळे त्यांच्या कामांवर परिणाम होणार नाही, मात्र त्यांनी बदललेल्या वेळांनुसार आपली योजना आखावी, असेही सांगण्यात आले आहे.

नागरिकांनी नोंद घ्यावी

प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी सर्व वाहन चालक, मालक आणि लायसन्ससाठी अर्ज केलेल्या नागरिकांना आवाहन केलं आहे की, या बदलांची नोंद घ्यावी आणि वेळेवर आरटीओ कार्यालयात उपस्थित राहून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. उष्णतेपासून संरक्षणासाठी ही काळजी घेतली जात असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा

या निर्णयामुळे नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेपासून दिलासा मिळणार आहे. मात्र यासाठी सर्वांनी वेळेचं भान राखणं, कार्यालयीन सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाने पुढाकार घेत उपाययोजना केल्या आहेत, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं, असं आवाहन करण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number