जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्यातले सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याची सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची डेडलाईन आज संपणार आहे. परंतु, आजही रस्त्यांची स्थिती मात्र, जैसे थे अशीच आहे. चंद्रकांत पाटील यांनी खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी नवी सरकारी डेडलाईन जाहीर केली होती. 15 डिसेंबरपर्यंत राज्यात एकही खड्डा दिसणार नाही, असा दावा पाटील यांनी केला होता.
मुंबई, डोंबिवली, कल्याण, नाशिकसारख्या शहरात अनेकांचे खड्ड्यांमुळे बळी गेले आहेत. या शहरांसह राज्यातही बऱ्याच ठिकाणी अनेक रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सेल्फे विथ खड्डे ही मोहीम हाती घेतली होती. जनतेमधून आवाज उठल्यानंतर आणि विरोधकांच्या टीकेनंतर सरकारने नवी डेडलाईन जाहीर केली होती. मात्र, आजही राज्यातील अनेक रस्ते खड्डेमुक्त पाहायला मिळेलेले नाही. म्हणूनच आता यावर खुद्द चंद्रकांत पाटील यांचे काय म्हणणे आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.