पनवेल–सायन महामार्गावर खारघर परिसरात एकाच लेनमध्ये अवघ्या 500 मीटर अंतरावर सलग दोन अपघात घडल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. खारघरमधील हिरानंदानी ब्रिजवर चार गाड्या एकमेकांना धडकल्या. त्यानंतर काही अंतरावर, त्याच लेनमध्ये आणखी तीन गाड्यांची साखळी धडक झाली.
या दोन्ही अपघातांमध्ये एकूण सात वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाची बाब म्हणजे, या अपघातांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र सलग दोन अपघातांमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
वाशिम-समृद्धी महामार्गावर अपघात
तसेच वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर जोगलदरीजवळ चॅनल क्रमांक 218 परिसरात भीषण अपघात घडला आहे. मागून भरधाव येणाऱ्या कारने समोर चालू असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली या अपघातात कारमधील चार जण गंभीर जखमी झाले असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे.जखमींना तात्काळ वाशिम येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबईहून उत्तर प्रदेशकडे प्रवास करत असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.