Central Railway: मुंबईकरांनो सावधान! 9 आणि 10 जून रोजी मध्य रेल्वेचा विशेष ब्लॉक; लोकल सेवेत मोठे बदल

मध्य रेल्वेने 9 आणि 10 जून रोजी कसारा घाट विभागात विशेष ब्लॉक जाहीर केला आहे. या काळात आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद राहणार असून अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.

Central Railway: मुंबईकरांनो सावधान! 9 आणि 10 जून रोजी मध्य रेल्वेचा विशेष ब्लॉक; लोकल सेवेत मोठे बदल

मुंबई: मुंबई आणि उपनगरातील लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने 9 आणि 10 जून रोजी कसारा घाट विभागात देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेतली असून त्यासाठी विशेष ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे कसारा आणि आसनगाव दरम्यान काही काळ लोकल सेवा बंद राहणार असून अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, खर्डी-थळ घाट परिसरातील ओव्हरहेड वायर आणि संबंधित यंत्रणांची तपासणी तसेच दुरुस्तीचे काम या कालावधीत करण्यात येणार आहे. सुरक्षित रेल्वे वाहतुकीसाठी ही कामे आवश्यक असल्याने दोन दिवस विशेष ब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दोन्ही दिवशी दुपारी 3.50 ते सायंकाळी 5.50 या वेळेत ब्लॉक राहणार आहे. या कालावधीत आसनगाव ते कसारा या दरम्यान लोकल वाहतूक पूर्णपणे बंद राहील. परिणामी कसारा मार्गावरील अनेक लोकल फेऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Eknath Khadse: 'अजून बाजारात भाव फुटायचेत…'; विधान परिषद निवडणुकीवरून एकनाथ खडसेंचा महायुतीला सणसणीत टोला

कसाराहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे येणाऱ्या काही लोकल गाड्या आसनगाव स्थानकापासूनच सुरू करण्यात येणार आहेत. दुपारी 3.35, 4.46 आणि 5.02 वाजताच्या फेऱ्या कसाराऐवजी आसनगावहून सुटतील. त्यामुळे कसारा आणि आसनगावदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागणार आहे.

त्याचप्रमाणे सीएसएमटीहून कसाराकडे जाणाऱ्या काही लोकल सेवाही आसनगावपर्यंतच मर्यादित ठेवण्यात आल्या आहेत. दुपारी 1.10, 2.17 आणि 2.46 वाजता सुटणाऱ्या लोकल गाड्या कसारापर्यंत धावणार नसून त्यांचा प्रवास आसनगाव येथेच संपेल.

ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर कसारा मार्गावरील नियमित लोकल वेळापत्रकात मोठा फरक पडणार आहे. सीएसएमटीहून कसारासाठी ब्लॉकपूर्वीची अखेरची लोकल दुपारी 12.30 वाजता सुटेल. त्यानंतरची पुढील लोकल थेट सायंकाळी 4.50 वाजता उपलब्ध होईल. तर कसाराहून सीएसएमटीकडे येणारी शेवटची लोकल दुपारी 2.42 वाजता सुटणार असून ब्लॉक संपल्यानंतर पहिली लोकल सायंकाळी 6.17 वाजता रवाना होणार आहे.

हेही वाचा: Chhagan Bhujbal : अखेर तिढा सुटला! राज्यसभेसाठी भुजबळांचे नाव निश्चित? मात्र समोर ठेवली 'ही' अट; नेमकी मागणी काय?

या विशेष ब्लॉकचा परिणाम काही मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांवरही होण्याची शक्यता असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा स्थानकांवरील सूचना फलकांवरून अद्ययावत माहिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दोन दिवसांच्या या विशेष ब्लॉकमुळे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होणार असली तरी भविष्यातील सुरक्षित आणि सुरळीत रेल्वे सेवेसाठी ही कामे महत्त्वाची असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number