मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सातत्यपूर्ण मागणीची दखल घेत मुख्य मार्गावर सोमवारपासून आणखी 12 सामान्य लोकल सेवांच्या वेळेवर वातानुकूलित (एसी) लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मध्य रेल्वेवरील एकूण एसी लोकल सेवांची संख्या 120 इतकी होणार आहे.
मध्य रेल्वेने नव्या एसी लोकल सेवा स्वतंत्रपणे सुरू न करता, सध्या धावणाऱ्या 12 सामान्य लोकलच्या जागी एसी लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार असला, तरी संबंधित वेळांमध्ये सामान्य लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही.
या बदलानंतर मुख्य मार्गावरील एसी लोकल सेवांची संख्या 80 वरून 92 इतकी वाढेल. तर हार्बर मार्गावरील 28 एसी लोकल सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. परिणामी, सोमवार ते शुक्रवार मुंबई विभागात मुख्य आणि हार्बर मार्गावर मिळून एकूण 120 एसी लोकल सेवा प्रवाशांच्या सेवेत असतील.
नवीन एसी सेवांमध्ये सकाळच्या गर्दीच्या वेळेत टिटवाळा–सीएसएमटी आणि घाटकोपर–सीएसएमटी या महत्त्वाच्या फेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत सीएसएमटी–कल्याण मार्गावरील काही महत्त्वाच्या फेऱ्याही एसी लोकलमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत. प्रवाशांची वाढती संख्या आणि वातानुकूलित लोकलला मिळणारा चांगला प्रतिसाद लक्षात घेऊन मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला असून, येत्या काळात एसी लोकल सेवांचा विस्तार करण्याबाबतही सकारात्मक विचार केला जाण्याची शक्यता आहे.