मुंबई: रविवारी, 1 मार्च 2026 रोजी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. उपनगरीय रेल्वे मार्गांवरील तांत्रिक दुरुस्ती, ट्रॅक मेंटेनन्स आणि सिग्नल यंत्रणेच्या कामांसाठी हा ब्लॉक अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकादरम्यान सकाळी 10.55 ते दुपारी 15.55 या वेळेत अप आणि डाउन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक राहणार आहे. या कालावधीत डाउन धीम्या मार्गावरील सकाळी 10.48 ते दुपारी 15.45 दरम्यान सुटणाऱ्या गाड्या सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या वळवलेल्या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील. विद्याविहार येथे त्या पुन्हा धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
तसेच, घाटकोपर येथून सकाळी 10.19 ते दुपारी 15.52 दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबा घेतील. त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या बदलांची नोंद घेणे आवश्यक आहे.
हार्बर मार्गावरही मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 या वेळेत मेगा ब्लॉक राहणार आहे. या काळात सीएसएमटी येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 दरम्यान वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील. तसेच पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सकाळी 10.17 ते दुपारी 15.47 दरम्यान सीएसएमटीकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ब्लॉक काळात सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी या विभागांदरम्यान विशेष उपनगरीय सेवा चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसेच गर्दी टाळण्यासाठी वेळेआधी प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या या मेगा ब्लॉकमुळे रविवारी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, दीर्घकालीन दृष्टीने सुरक्षित आणि सुरळीत रेल्वे सेवा देण्यासाठी ही कामे अत्यावश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करावे आणि अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.