राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा नवी दिल्ली पार पडला. एका दिमाखदार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. नवी दिल्लीत पार पडलेल्या या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अकादमी पुरस्कारांचं वितरण झालं. यावेळी अभिनेते प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी रत्न आणि सदस्यता पुरस्काराने गौरवण्यात आलं.
हा सन्मान स्वीकारताना प्रशांत दामले म्हणतात.. हा खुप मोठ्ठा सन्मान आहे. माझ्या सर्व सहकलाकारांच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या सर्व बॅक स्टेज कलाकारांच्या वतीने आणि फक्त महाराष्ट्र, भारत नाही तर संपूर्ण जगातल्या मराठी नाट्य रसिकांच्या वतीने मी हा पुरस्कार अतिशय नम्रपणे स्वीकारत आहे. अनेक कलाकारांनी आणि प्रेक्षकांनी प्रशांत दामले यांचं अभिनंदन केलंय.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशातील ७५ वर्षांच्या पुढील कलाकारांना विशेष अमृत पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये मालिनी राजूरकर तसेच तीजनबाई यांना अकादमी फेलोशिपने गौरवण्यात येणार आहे. कला क्षेत्रातील हा महत्त्वाचा सन्मान समजला जातो. प्रशांत दामले यांच्यासह आरती अंकलीकर टिकेकर, शमा भाटे, मीना नाईक, कुमार सोहोनी आदींनाही संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाले आहेत.