रत्नगिरी: रत्निगरी जिल्ह्यातील ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारतर्फे 'प्रधानमंत्री यशस्वी अंतर्गत टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल योजना' राबविण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गीय विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी संपूर्ण शैक्षणिक खर्च शासनामार्फत भागविणे हा आहे.
या योजनेत इयत्ता 9 ते 12 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत दिली जाणार आहे. रत्नगिरी जिल्ह्यातील 2022-23, 2023-24, आणि 2024-25 या शैक्षणिक वर्षात बोर्ड परिक्षेत सतत 100% निकाल देणाऱ्या टॉप क्लास शाळांची निवड करण्यात आली आहे. अशा शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकडून शैक्षणिक खर्च दिला जाणार आहे.
योजनेत ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न कमाल 2 लाख 50 हजार असणे गरजेचे आहे. निवड मेरिट यादीनुसार होईल आणि त्यात किमान 30% जागा मुलींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. इयत्ता 9 आणि 10 वी च्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 75 हजार रुपये (शाळेचे शुल्क, वसतिगृह, परीक्षा शुल्क, पुस्तके, गणवेश, इत्यादींसाठी) आर्थिक मदत करणार आहे. तसेच, इयत्ता 11 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 लाख 25 हजार रुपये (वसतिगृह शुल्क, प्रयोगशाळा शुल्क, कॉम्पुटर आणि कोचिंग फी इत्यादींसाठी) आर्थिक मदत करणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर विद्यार्थी अर्ज भरतील. त्यानंतर, शाळेचे नोडल अधिकारी पडताळणी करतील. राज्य सरकारकडून अंतिम मंजूरीनंतर मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र मेरिट याची केली जाईल. तसेच, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा होईल. मात्र, या योजनेअंतर्गत काही अटी लागू आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थिती आधार लिंक केलेल्या प्रणालीद्वारे तपासली जाणार असून नियमित उपस्थिती आणि समाधानकारक शैक्षणिक प्रगती गरजेचे आहे. सोबतच, इतर शासकीय योजनेंतर्गत एकाच उद्देशासाठी दुहेरी लाभ घेता येणार नाही.
'या योजनेतून जिल्ह्यातील ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच, इच्छुक विद्यार्थ्यांनी विलंब न करता अर्ज भरावा', असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे. 'अधिक माहितीसाठी रत्नगिरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव येथे संपर्क साधावा', असेही सांगण्यात आले आहे.