नाशिक, २६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नाशिकच्या सिडको परिसरात पुन्हा गाड्यांची तोडफोड झाली. याआधी नाशिकच्या सिडकोतील शिवाजी चौक परिसरात दिवसाढवळ्या हत्या झाली. या लागोपाठच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
शुक्रवारी रात्री ११ वाजता गावगुंडांची दहशत पाहायला मिळाली. या गावगुंडांनी धुडगूस घालत परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. तोडफोडीची घटना परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गावगुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर अंबड पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत दोन संशयितांना अटक केली आहे. नाशिकमध्ये गावगुंडांनी शिवाजी चौक परिसरातील अचानक चौक, कृष्णमंदिर मंदिर चौक व इतर परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड केली आहे. इतकंच नाही, तर एका नामांकित कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला देखील मारहाण करून त्याची दुचाकी फोडली आहे. ही सगळी घटना परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झाली आहे. पोलीस अटक करण्यात आलेल्या संशयित गावगुंडांची कसून चौकशी करीत आहेत.