थोड्याच वेळात विधान परिषदेचा निकाल समोर येणार आहे. मात्र, निकालापूर्वीच राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांना ईडीने दणका दिला आहे. अनिल परब यांना दुसऱ्यांना ईडीने समन्स बजावले असून मंगळवारी ईडी समक्ष हजर राहण्याचे आदेश परबांना देण्यात आले आहेत.
दापोली येथील रिसॉर्ट संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी अनिल परब ईडीच्या रडारवर आहे. याआधीही ईडीने अनिल परब यांना समन्स बजावले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे परब चौकशीला गैरहजर राहिले होते. त्यानंतर आता परब यांना मंगळवारी पुन्हा चौकशीसाठी बोलवले आहे.
तर, ईडीने एकदा त्यांच्या शासकीय निवासस्थानी चौकशी केली होती. अनिल परब यांच्या संबंधित अशा एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाडी टाकण्यात आल्या होत्या. तसेच अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीकडून धाडसत्र हाती घेण्यात आलं होतं. त्यासोबतच वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी आणि दापोलीतही ईडीकडून छापे टाकले होते. १०० कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी सुरू होती. यासोबतच अनिल परब यांच्यावर सुमारे ५० कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचाही आरोप आहे.