एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करावे आणि एसटी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ मिळावे या मागण्यांसाठी राज्यात एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू आहे. भाजप नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. यातच भाजप नेते नितेश राणे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत राज्यसरकारवर निशाणा साधला आहे.
नितेश राणे म्हणाले, भाजपचे मुख्यमंत्री असतानाही परिवहन महामंडळाचे अधिकार शिवसेनेकडेच होते. त्यावेळी मागणी का केली नाही? असा प्रश्न उपस्थित करत उगाच भाजपकडे बोट दाखविण्यात काय अर्थ असे म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाला वेळ लागेल परंतु मुख्यमंत्र्यांच्या सोयीनुसार मुंबईतच उद्या किंवा परवा एक दिवसाचे विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्याचे त्यांनी सांगितले. या अधिवेशनाला आम्ही सर्व आमदार येतो, पाठिंबा देतो, एकही आमदार विरोध करणार नाही, असे नितेश राणे म्हणाले.
भाजप नेते नितेश राणे यांनी मलिकांवर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, नवाब मलिक गद्दार आहेत. तसेच मलिक हे अतिरेक्यांना साथ देणारा देशद्रोही आहे, त्याच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देता कामा नये, त्याला पाकिस्तानला हाकलून द्या, असे म्हणत नितेश राणे यांनी मलिकांवर टीका केली आहे. तसेच नवाब मलिक मंत्रिमंडळात कसे आहेत? असा सवाल उपस्थित करत त्यांची हकालपट्टी करण्याची मागणीही नितेश राणे यांनी केली आहे.