लग्न जुळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यात पाच दिवसांत दोन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या सोनाळा येथील एका 28 वर्षीय युवकाने लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली. हरिष वानखडे वय 28 वर्ष असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून घरातील सर्व सदस्य आपापल्या कामावर गेल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
हरिष हा भूमिहीन असून अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे वडील मागील गेल्या 2 ते 3 वर्षापासुन त्याच्या लग्नासाठी मुलगी पाहत होते, परंतु गरीब परिस्थितीमुळे त्याला मुलगी द्यायला कुणी तयार होत नव्हते. याच नैराशातून त्याने आत्महत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तर दुसरी घटना अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या चिखली तालुक्यातील मंगरूळ येथे घडली असून सत्यपाल भिसे या 25 वर्षीय तरुणाने सुद्धा लग्न जुळत नसल्याने व्यसनाधीन होऊन झाडाला फाशी घेतली आणि आपली जीवनयात्रा संपवली. सत्यपालच्या सोबतच्या मित्रांचे लग्न झाले होते, शिक्षण भरपूर झाल्याने त्याला नोकरी मिळत नव्हती, शिवाय लग्न सुद्धा जुळत नव्हते, त्यामुळे त्याला दारूचे व्यसन सुद्धा लागले होते. या नैराश्यातून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. दोन्ही प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आले असून तपास सुरु आहे.