जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटात खाजगी बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १३ प्रवाशांचा मृत्यू तर २८ जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आखडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. खाजगी बस दरीत कोसळल्याची घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे. तर, या अपघाताप्रकरणी चौकशीचे आदेश फडणवीसांनी दिले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दुर्घटनेत २९ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी १८ प्रवाशांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर १० प्रवाशांना खोपोली आणि एका प्रवाशाला खासगी जकोटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात २४ पुरुषांचा समावेश असल्याचे फडणवीस म्हणाले.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात ही दुर्दैवी घटना असल्याचे फडणवीस म्हणाले. या अपघातात जे प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना शासन मदत करणार आहे. तसेच जखमी प्रवाशांवर उपचार करण्याचे आदेशही दिले असल्याचे फडणवीस म्हणाले. याशिवाय ही बस कोसळण्यामागचं नेमकं कारण काय, याचीदेखील चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. या दुर्घटनेतील मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना प्रकट करत मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 15, 2023