शहरातील नागरी प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 'महापौर Gen Next Civic Fellows' या अभिनव उपक्रमाला महापालिका सभागृहाने मंजुरी दिली असून, या माध्यमातून तरुणांना थेट नागरी प्रशासन, विकासकामे आणि धोरणनिर्मिती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात मुंबईतील 10 प्रशासकीय विभागांमध्ये एकूण 50 तरुणांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या तरुणांना संबंधित विभागांमध्ये नियुक्त करून प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय साधण्याची जबाबदारी देण्यात येईल. स्थानिक समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना राबविण्यासाठी हे तरुण अधिकाऱ्यांसोबत काम करतील.
नागरी समस्यांवर डिजिटल देखरेख
या फेलोशिपअंतर्गत सहभागी तरुण रस्त्यांवरील खड्डे, कचरा व्यवस्थापन, जलभराव, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा आणि इतर नागरी समस्यांवर नियमित लक्ष ठेवतील. त्यासाठी त्यांना विशेष मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले जाईल. या ॲपच्या माध्यमातून समस्यांचे फोटो, स्थानाची माहिती आणि अहवाल थेट संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवता येणार असल्याने तक्रारींवर तातडीने कारवाई करणे शक्य होणार आहे.
प्रशिक्षणासह मानधन आणि प्रमाणपत्र
योजनेसाठी निवड झालेल्या तरुणांना नागरी प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रकल्प व्यवस्थापन, डिजिटल मॉनिटरिंग आणि नागरिकांशी संवाद याबाबत विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच त्यांच्या कामासाठी मानधन देण्यात येणार असून, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अधिकृत प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. त्यामुळे तरुणांना प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्याबरोबरच त्यांच्या कौशल्यविकासालाही चालना मिळणार आहे.
प्रायोगिक प्रकल्पानंतर विस्ताराची तयारी
महापालिका हा उपक्रम सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर राबविणार आहे. या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाल्यास आणि अपेक्षित यश मिळाल्यास भविष्यात सहभागी तरुणांची संख्या 50 वरून 200 पर्यंत वाढविण्याचा विचार करण्यात येणार आहे.
नागरी तक्रारींच्या जलद निवारणावर भर
या उपक्रमामुळे शहरातील नागरी तक्रारींचे जलद निराकरण करण्यास मदत होईल, असा महापालिका प्रशासनाचा विश्वास आहे. तरुणांच्या सहभागातून नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक मजबूत होईल. तसेच विकासकामांवर प्रभावी देखरेख, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि नागरिकांना अधिक दर्जेदार नागरी सेवा देण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.