ब्लड शुगर वाढण्याचा विषय आला की बहुतेक लोकांच्या मनात सर्वप्रथम गोड पदार्थ, जंक फूड किंवा जास्त कार्बोहायड्रेट असलेले अन्न यांचा विचार येतो. अनेकांना असे वाटते की गोड खाणे कमी केले की रक्तातील साखरेची पातळी आपोआप नियंत्रणात येईल. मात्र प्रत्यक्षात यामागील कारण थोडे वेगळे आहे. अनेकदा योग्य आहार घेत असूनही ब्लड शुगर वाढताना दिसते. यामागे शरीरातील काही जैविक प्रक्रिया तसेच दैनंदिन जीवनशैलीतील सवयी कारणीभूत असू शकतात. तज्ज्ञांच्या मते, रक्तामधील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर केवळ आहार नव्हे तर संपूर्ण जीवनशैलीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
ताणतणाव ठरू शकतो मोठे कारण
ताण येणे ही केवळ मानसिक समस्या नसून ती शरीरातील हार्मोन्सवरही परिणाम करते. जेव्हा व्यक्ती जास्त तणावाखाली असते, तेव्हा शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोनची पातळी वाढते. हे हार्मोन रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढवू शकते. दीर्घकाळ तणाव राहिल्यास इन्सुलिनचा प्रभावही कमी होऊ शकतो आणि त्यामुळे रक्तामधील साखरेची पातळी असंतुलित होण्याची शक्यता वाढते.
झोपेची कमतरता बिघडवते संतुलन
दररोज पुरेशी आणि गुणवत्तापूर्ण झोप न घेतल्यास त्याचा थेट परिणाम ब्लड शुगरवर होऊ शकतो. साधारणपणे सहा ते सात तासांची झोप आवश्यक मानली जाते. झोपेची कमतरता इन्सुलिन प्रतिरोध वाढवते, ज्यामुळे शरीर ग्लुकोजचा योग्य प्रकारे वापर करू शकत नाही. दीर्घकाळ अशी परिस्थिती राहिल्यास मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
जास्त तीव्र व्यायामाचाही तात्पुरता परिणाम
व्यायाम हा साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. मात्र काही वेळा अतितीव्र व्यायामाच्या वेळी शरीराला तात्काळ ऊर्जा मिळावी म्हणून अधिक ग्लुकोज रक्तात निर्माण केले जाते. त्यामुळे काही काळासाठी ब्लड शुगर वाढलेली दिसू शकते. मात्र ही स्थिती सहसा तात्पुरती असते.
आजारीपणातही वाढू शकतो ब्लड शुगर
जेव्हा शरीर एखाद्या संसर्गाशी किंवा आजाराशी लढत असते, तेव्हा त्याला अधिक ऊर्जेची गरज भासते. अशावेळी शरीर रक्तात अधिक ग्लुकोज निर्माण करते. त्यामुळे ताप, संसर्ग किंवा इतर आजारांच्या काळात रक्तातील साखरेची पातळी वाढलेली दिसू शकते.
हार्मोनल बदलांकडे दुर्लक्ष करू नका
महिलांमध्ये मासिक पाळीच्या काळात तसेच रजोनिवृत्तीच्या टप्प्यावर हार्मोन्समध्ये बदल होतात. या बदलांचा इन्सुलिनच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे ब्लड शुगर वाढू शकते. हा परिणाम काही दिवस टिकू शकतो.
कशाकडे लक्ष द्यावे?
जर रक्तातील साखरेची पातळी वारंवार वाढत असेल, तर केवळ आहारालाच जबाबदार धरू नये. झोपेची गुणवत्ता, ताणतणाव, व्यायामाची पद्धत आणि एकूण आरोग्यस्थिती यांचाही विचार करणे आवश्यक आहे. वेळोवेळी तपासणी करून आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन ब्लड शुगर अधिक प्रभावीपणे नियंत्रणात ठेवता येऊ शकतो.
आरोग्य सूचना (Health Disclaimer): येथील आरोग्यविषयक माहिती ही केवळ सामान्य माहिती आणि जागरूकतेसाठी दिलेली आहे. कोणत्याही आजाराचे निदान, उपचार किंवा औषधोपचार करण्यापूर्वी नेहमी तज्ञ डॉक्टरांचा किंवा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या माहितीतून होणाऱ्या कोणत्याही परिणामासाठी जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल जबाबदार राहणार नाही.