पुण्यातील मंगळवार पेठेतील ओम ब्लड बँकेकडून 19 ऑक्टोबर रोजी एका रूग्णासाठी चक्क एक्सपायरी डेट उलटून गेलेलं रक्त देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
बारामतीच्या योगेश लासुरे यांची पत्नी दिपाली लासुरे यांना स्तनांचा कॅन्सर असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने बी पोझिटिव्ह रक्त देण्याचा सल्ला दिला. त्यानंतर योगेश लासुरे हे मंगळवार पेठेतील ओम ब्लड बँकेमधे पोहचले आणि त्यांनी पैसे मोजून रक्ताची पिशवी खरेदी केली आणि ती घेऊन ते पुन्हा हॉस्पिटलला आले. मात्र रक्ताच्या पिशवीवरील एक्सपायरी डेट पाहून डॉक्टर संतापले. कारण या रक्ताच्या पिशवीवर एक्सपायरी डेट 10-10-2018 ही होती. डॉक्टरांनी हे रक्त लासुरे यांच्या पत्नीला देण्यास नकार दिला.
त्यानंतर लासुरे यांनी पुन्हा ब्लड बॅंकेशी संपर्क साधला असता चुकीने या रक्ताच्या पिशवीवर पुढील महिन्याऐवजी ऑक्टोबर महिन्यातील एक्सपायरी डेट टाकली गेल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर लासुरे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागांकडे याची तक्रार केली. मात्र या विभागाने तक्रार दाखल करुन लासुरे यांना पोहच देण्याव्यतिरीक्त काहीही केलं नाही.
तर ओम ब्लड बँकेकडून क्लेरीकल मिस्टेकमुळे हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे.