चंदीगड: आजच्या डिजिटल युगात ‘ऑनलाइन शॉपिंग’ ही आपली गरज आणि सवय झाली आहे. घरबसल्या किराणा मालापासून ते इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत सर्व काही दारात हजर होते. मात्र, याच सुविधेचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचे नवीन जाळे विणले आहे. चंदीगडमधील एका महिलेसोबत घडलेली घटना डोळ्यात अंजन घालणारी आहे. ‘अति घाई संकटात नेई’ याचा प्रत्यय या घटनेतून येतो. केवळ खराब झालेले उत्पादन बदलण्यासाठी किंवा त्याचे पैसे परत मिळवण्यासाठी केलेल्या एका छोट्या चुकीमुळे या महिलेला तब्बल 80 हजार रुपयांचा फटका बसला आहे.
नेमकी घटना काय घडली?
चंदीगडमधील एका महिलेने प्रसिद्ध क्विक कॉमर्स अॅप Blinkit वरून काही किराणा सामान मागवले होते. पार्सल आले, पण त्यातील काही उत्पादने खराब निघाली. स्वाभाविकच, महिलेने परतावा (Refund) मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. इथेच तिने सर्वात मोठी चूक केली. अॅपमधील अधिकृत सपोर्ट सिस्टम वापरण्याऐवजी तिने गुगलवर ‘ब्लिंकिट कस्टमर केअर नंबर’ शोधला. गुगल सर्चमध्ये सायबर भामट्यांनी एसइओ (SEO) आणि जाहिरातींच्या माध्यमातून बनावट नंबर वरच्या क्रमांकावर रँक केले होते. त्या बनावट नंबरवर विश्वास ठेवून महिलेने कॉल केला आणि तिथेच ती सायबर ठगांच्या जाळ्यात ती महिला अडकली.
कॉलवर असलेल्या व्यक्तीने ब्लिंकिटचे प्रतिनिधी असल्याचे भासवले. महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने अत्यंत प्रोफेशनल भाषेत संवाद साधला. परतावा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या बहाण्याने त्याने महिलेला ‘AnyDesk’ किंवा तत्सम स्क्रीन शेअरिंग अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. अनेकदा आपल्याला कल्पना नसते की, तक्रार निवारणासाठी कोणत्याही स्क्रीन शेअरिंग अॅपची गरज नसते. मात्र, पैसे परत मिळण्याच्या आशेपोटी महिलेने ते अॅप डाउनलोड केले आणि तिच्या मोबाईलचा संपूर्ण ॲक्सेस (Control) नकळत समोरच्या भामट्याला दिला.
स्क्रीन शेअर होताच गुन्हेगाराने अत्यंत शिताफीने महिलेच्या बँक खात्याचे आणि वॉलेटचे तपशील मिळवले. रिफंड तर मिळाला नाहीच, पण उलट तिच्या बँक खात्यातून एकामागून एक व्यवहार करत सायबर चोरट्यांनी तब्बल 80 हजार रुपये काढून घेतले. CyberDost (CyberDost I4C) या गृहमंत्रालयाच्या सायबर सुरक्षा विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
Online shopping mein refund ka issue aajkal ek naya scam trap ban chuka hai Sirf ek galat customer care number par call karna aapko financial loss mein daal sakta hai Ek chhoti si galti bada nuksaan kara sakti hai, isliye verify karna zaroori hai#OnlineShopping #RefundScam pic.twitter.com/uVl6WZGg6u — CyberDost I4C (@Cyberdost) February 8, 2026
अशी फसवणूक टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी?
या घटनेवरून आपण धडा घेणे गरजेचे आहे. कोणत्याही ऑनलाइन ऑर्डरमध्ये अडचण आल्यास, गुगलवर कस्टमर केअर नंबर शोधण्याची चूक कधीही करू नका. नेहमी संबंधित कंपनीच्या अधिकृत अॅप किंवा वेबसाइटवरील ‘Help’ किंवा ‘Support’ सेक्शनचाच वापर करा. लक्षात ठेवा, कोणतीही कंपनी तुम्हाला रिफंड देण्यासाठी स्क्रीन शेअरिंग अॅप (उदा. AnyDesk, TeamViewer) डाउनलोड करण्यास किंवा UPI पिन सांगण्यास सांगत नाही. स्क्रीन शेअर करणे म्हणजे घराची चावीच चोरट्यांच्या हाती देण्यासारखे आहे.
जर दुर्दैवाने तुमची किंवा तुमच्या ओळखीत कोणाची अशा प्रकारे फसवणूक झालीच, तर घाबरून न जाता तत्काळ पावले उचलणे आवश्यक आहे. सायबर गुन्ह्याची तक्रार नोंदवण्यासाठी भारत सरकारने 1930 हा नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर उपलब्ध करून दिला आहे. यावर त्वरित संपर्क साधा किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर जाऊन तुमची तक्रार नोंदवा. तुमची सतर्कताच तुमची सुरक्षा आहे, त्यामुळे हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि सुरक्षित राहा.