विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. त्यावरुन अजित पवार यांनी वेळोवेळी स्पष्टीकरण दिले आहे. राज्याच्या राजकारणातील फोडाफोडीच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. “ज्यांना फोडाफोडीचे राजकारण करायचे असेल, ते त्यांचे राजकीय डावपेच असतील, तर त्यावर आम्ही योग्य वेळी घेऊ”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपावर दिली आहे
यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे घेण्यात आलेल्या कृषी कायद्यांवर देखील निशाणा साधला. अमरावती अॅग्रिकल्चर फोरम येथे आज, रविवारी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी कृषी धोरणावरून केंद्र सरकारवर टीका केली. शरद पवार हे सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. माध्यमांशी संवाद साधत असताना शरद पवारांना अजित पवारांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी सांगितले की, ‘भाजपच्या फोडाफोडीवर योग्यवेळी भूमिका घेऊ.’ तसंच, जर कुणाला फोडण्याचा प्रयत्न केला तर उत्तर देऊ.’, असा इशारा शरद पवारांनी यावेळी दिला.
गेल्या आठवड्यामध्ये अजित पवार हे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले होते. अजित पवार हे 40 आमदारांसोबत भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशामध्ये अजित पवार यांनी अचानक पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले होते. तसंच त्यांचा मोबाईल नॉटरिचेबल झाला होता. त्यामुळे ते नाराज असून भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला जात होता. त्यातच राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी अजित पवारांची भेट देखील घेतली होती. त्यामुळे राज्यातील राजकीय हालचाली देखील वाढल्या होत्या.