कल्याण १० जून २०२३, प्रतिनिधी : कल्याण-डोंबिवलीमधील एका भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे भाजपच्या इतर नेत्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात भूमिका घेतली. हा वाद आता विकोपाला गेला आहे. त्यावरच आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दबावात गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत थेट श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला आव्हान दिल्यामुळे उद्विग्न झालेल्या श्रीकांत शिंदेंनी खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय. स्वार्थापोटी युतीत कुणीतरी मिठाचा खडा टाकत असल्याचा आरोप श्रीकांत शिंदेंनी केलाय.
एका व्हिडिओच्या मार्फत श्रीकांत शिंदेंनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘त्यामध्ये ते म्हणाले की, ‘भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी केलेले वक्तव्य मी पाहिले. सोशल मीडियावरही वाचले. मला वाटते उमेदवार कोण असेल ते वरिष्ठ पातळीवर ठरवले जाईल. जो योग्य उमेदवार असेल त्याला उमेदवारी दिली जाईल. पण मला एकच सांगायचंय, ही युती वेगळ्या विचाराने झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका विचाराने महाराष्ट्रात युती स्थापन केली. युती झाल्यानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. युती आल्यानंतर सरकार स्थापन केलं. सरकारच्या माध्यमातून चांगलं काम होत आहे. असे ते म्हणाले.’
पुढे ते म्हणाले की, ‘युती जेव्हापासून आहे, गेल्या नऊ वर्षांपासून मी खासदार आहे. मला दोन वेळा नागरिकांनी निवडून दिलं आहे. तेव्हापासून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन जाण्यासाठी मी काम करतोय. निधीचा विषय असेल तर मी आताच उल्हासनगरमधील भाजप नगरसेवकांना 55 कोटी देण्याचं काम केलं. त्याचा जीआरही काढण्यात आला. काही दिवसांमध्ये टेंडर निघतील. काम चांगलं चालू असताना कुणीही युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये. सगळ्यांनी युतीसाठी काम केलं पाहिजे.’
केंद्रात मोदींचं सरकार यावं हेच आपलं ध्येय असल्याचंही खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय. नरेंद्र मोदी पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान व्हावेत हे आपलं ध्येच आहे, देशातील तमाम जनेतचाही तसा निर्धार आहे. पण डोंबिवलीमधल्या काही नेत्यांकडून स्वार्थी राजकारण सुरु असून शिवसेना-भाजप युतीत मिठाचा खडा टाकला जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान म्हणून कसे निवडून येतील यासाठी काम केलं पाहिजे. यासाठी कोणताही स्वार्थ ठेवू नये. मलाही कोणताच स्वार्थ नाही. मला सांगितलं की, कल्याण लोकसभेचा राजीनामा द्या. तर मी राजीनामा द्यायला तयार आहे आणि पूर्णपणे पक्षासाठी युतीचं काम करायला मी तयार आहे.’ असे देखील श्रीकांत शिंदेंनी स्पष्टपणे सांगितले.