सीडीएस बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचे पार्थिव गुरुवारी सायंकाळपर्यंत सैन्यदलाच्या विमानाने राजधानी दिल्लीमध्ये आणले जाणार आहे. त्यानंतर शुक्रवारी सकाळी रावत आणि त्यांच्या पत्नीचे पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे.
शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत अंत्यदर्शानासाठी वेळ देण्यात येईल. यानंतर कामराज मार्गावरुन दिल्ली छावणीतील बराड स्मशानभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येईल. अंत्यसंस्कारासाठी रावत यांची छोटी बहीण आणि भाऊ उपस्थित राहणार आहेत. जनरल रावत यांना दोन मुली आहेत.
तामिळनाडूमधील उटी जिल्ह्यातील कुन्नरमध्ये लष्करप्रमुख बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळले होते. या हेलिकॉप्टरमध्ये देशाचे संरक्षणदलाचे प्रमुख बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि प्रमुख अधिकारी होते. या अपघातामध्ये सैन्यप्रमुख बिपिन रावत आणि त्यांची पत्नी जखमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी यांच्यासह १३ जवान शहीद झाले.