गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात टॅक्सी चालकांसाठी अनेक नियम समोर येत आहेत. अशातच आता इ-बाइक टॅक्सी चालकांसाठी एक नवीन नियम समोर आला आहे. या नियमानुसार, एका चालकाने एका वेळी अनेक अॅप कंपन्यांमध्ये नोंदणी करण्याऐवजी एका दिवसात केवळ एकाच कंपनीसाठी सेवा देता येणार आहे. याबद्दल आज परिवहन विभागात विशेष बैठक पार पडणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सध्या एकाच चालकाची अनेक अॅप कंपन्यांमध्ये नोंदणी आहे. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.ज्या अॅपमध्ये कमी भाडे असते ते भाडं चालक रद्द करतात. त्यावर आता उपाय म्हणून एका दिवसात चालकाला फक्त एका कंपनीसाठी परवानगी देण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.
बाइक टॅक्सीसेवेसाठी केवळ इलेक्ट्रिक दुचाकी बंधनकारक आहे. त्यात कोणतीही तडजोड करण्यात येणार नसल्याचे परिवहन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र शासनाने इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीसाठी नियम तयार केले होते, परंतु नियमांचे उल्लंघन आणि सुरक्षेच्या कारणास्तव कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
मे 2026 मध्ये परिवहन मंत्रालयाने बेकायदेशीर बाईक टॅक्सी ॲप्स ब्लॉक करण्याचे आदेश सायबर सेलला दिले. त्याचप्रमाणे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक अॅग्रीगेटर अॅपमध्ये वाहनाचा परवाना क्रमांक, वाहन क्रमांक, चालकाचे नाव, छायाचित्र आणि 'पॅनिक बटन' सुविधा अनिवार्य करण्याची तयारीही शासनाने सुरू केली आहे.