कोन्नगर (West Bengal) रेल्वे स्थानकावर बिहार (Bihar) येथील चार प्रवासी मजूरांनी प्रामाणिकतेचे उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे. या मजूरांना स्थानकावर एका छोट्या बॅगेत 10 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने सापडले होते. कोणताही मोह न बाळगता त्यांनी ती बॅग पोलिसांकडे सुपूर्द केली आणि शेवटी ती त्याचे हक्क असलेल्या रूपश्री या बँक मॅनेजरकडे सुखरूप परत पोहोचली.
रूपश्री कोन्नगर (Konnagar) येथील रहिवासी असून त्या रविवारच्या दिवशी वंदे भारत ट्रेनने कोडरमा (Koderma) येथे जाणार होत्या. सकाळी 5:30 वाजता त्यांनी ट्रेनमध्ये प्रवेश केला, पण घाईत त्यांच्याकडून सोन्याने भरलेली बॅग रेल्वे स्थानकावरील सीटवर विसरली. ट्रेन सुटल्यानंतर झालेली चूक त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी तात्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच तपासाला सुरुवात केली. स्टेशनवरील CCTV फुटेजमध्ये चार व्यक्ती ती बॅग उचलून नेताना दिसले. फुटेज स्थानिक नागरिकांना दाखवले गेले, परंतु कोणीही मजूरांची ओळख पटवू शकले नाही.
यानंतर रेल्वे पोलिसांनी फुटेजमधून एक फोन नंबर मिळाला. त्यावर संपर्क केल्यावर समजले की हे मजूर बिहार मधील सिवान येथून लिलूआ येथे कामासाठी आले आहेत. मजूरांनी सांगितले की त्यांना बॅग सापडल्यानंतर त्यांनी स्वतःच परिसरात चौकशी केली. मालक सापडला नाही म्हणून पुढे ते पोलिसांकडे गेले. प्रचंड किमतीचे दागिने मिळूनही त्यांनी प्रामाणिकपणे ते परत देण्याचा निर्णय घेतला.
अखेर, पोलिसांच्या मदतीने दागिन्यांनी भरलेली बॅग रूपश्री यांच्यापर्यंत परत पोहोचली. रूपश्री यांनी या मजूरांचे मनापासून आभार मानले. या चारही मजूरांच्या प्रामाणिक वागणुकीने प्रभावित होऊन पोलिसांनी त्यांना अधिकृत प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. या मजूरांच्या गटाचे नेते मोहम्मद इस्माईल यांनी सांगितले, “आम्ही झोपडपट्टीत, भाड्याच्या खोलीत राहतो; आमच्याकडे काहीच जास्त नाही. पण आमचं लक्ष्य प्रामाणिकपणे मेहनत करूनच पैसे कमवण्याचं आहे.” या उदाहरणातून सिद्ध होते की परिस्थिती कितीही कठीण असो, प्रामाणिकता आणि मानवतेचा मार्ग नेहमीच कौतुकास पात्र ठरतो.