काल पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी येथे आठ जणांचा मृत्यूची घटना समोर आली होती. ह्या संपूर्ण घटना विषारी दारू पिल्यामुळे झाल्याची चर्चा शहरात होत असतानाच आता पुण्याच्या हडपसर या ठिकाणी देखील दारू पिल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हडपसर या ठिकाणी दारू सप्लाय करणाऱ्या योगेश वानखेडेला पोलिसांनी सध्या ताब्यात घेतले असून त्याच्याकडे तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्यान पिंपरी चिंचवड मधून झालेल्या मृत्यू प्रकरणी आता पोलिसांची प्रतिक्रिया समोर आली आहे. हे मृत्यू विषारी दारू मुळेच झाल्याचे पोलिसांकडून स्पष्ट केले आहे.
याबाबत पोलिस तपास करत असून यामध्ये फॉरेन्सिक टीम देखील पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाली आहे आणि पुढील तपास करत आहे. याच बरोबर याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. तसेच दापोडीतील संजय नगर परिसरातील विरका कुटुंबीयांच्या इथे हा अवैध दारू विक्रीचा अड्डा चालत होता अशी माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. योगेश वानखेडे हा अवैध दारूचा पुरवठा विरका कुटुंबीयांना करत होता. त्यानंतर विरका कुटुंबीय ही अवैध दारू आपल्या ग्राहकांना विकत होते आणि याच विषारी दारूतून आठ जणांचा जीव गेल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
विषारी दारु प्यायल्याने 13 जणांचा मृत्यु
ही स्पिरिटयुक्त विषारी दारु योगेश वानखेडे याने बनवली होती. ती दारु पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या भागांमधे मिळून विकली गेली. दापोडी, फुगेवाडी, हडपसर, काळेपडळ भागातील ज्यांनी दारु प्यायली ते तोंडाला फेस येउन मृत्युमुखी पडले. योगेश वानखेडे हा सराईत दारु विक्रेता असुन याआधी देखील त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत.
फडणवीसांचे कठोर कारवाईचे आदेश
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विषारी दारूमुळे ज्या लोकांचा मृत्यू झाला, त्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात संबंधित ठिकाणी छापे मारून दोन्ही पोलिस दलाकडून समन्वयाने तपास करावा असं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे. या प्रकरणात कर्नल सिंग विरखा त्याचा मुलगा आणि योगेश वानखेडेसह 8 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कठोर कलमे दाखल करण्यात यावे असे आदेश दिले आहेत. यावेळी अबकारी विभाग सुद्धा तपासात सहभागी झाला असून मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. कोणाचीही गय करू नका, कठोर कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिस दलाला दिले आहेत.
पुणे- पिंपरी चिंचवड मधील 15 जणांचा मृत्यू
1 राहुल शरद क्षीरसागर, वय 45 वर्षे राहणार पांढरे मळा सर्वे नंबर 257 हडपसर पुणे
2 विजय. भू कुरलाल शर्मा वय 45 वर्षे राहणार पांढरी मळा ससाणे नगर हडपसर पुणे
3 अरुण डाडर ,हडपसर
4 अशोक रमेश चव्हाण ,काळेपडळ
5 विजय भूकुरलाल शर्मा , पांढरे मळा ससाणे नगर हडपसर
6 राजेश राजपूत, फुगेवाडी
7 पांडुरंग फुगे, फुगेवाडी
8 आनंद देसाई, फुगेवाडी
9 अकबर पठाण, फुगेवाडी
10 आनंद निकाळजे, फुगेवाडी
11 सुभाष डिगीकर , पिंपरी
12 अक्षय अवसरमल , पिंपरी
13 बाबा शेख, पिंपरी
14 राजेंद्र राठोड
15 विजय राठोड