मुंबई, १० जुलै प्रतिनिधी : बॉलिवूडचे शहेनशाह अशी ओळख असणारे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे त्यांच्या अभिनयाने आणि त्यांच्या अतिशय विनम्र स्वभावाने चाहत्यांची मनं जिंकतात. अनेक वेळा बिग बींची एक झलक पाहण्यासाठी चाहते त्यांच्या जलसा या बंगल्याबाहेर गर्दी करतात. दरम्यान अमिताभ बच्चन यांनी एक खास व्हिडीओ समाज माध्यमांवर सामायिक केला आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी जलसा या बंगल्याबाहेर चाहत्यांनी गर्दी केली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आपल्या चाहत्यांच्या प्रेमाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बिग बींनी हा खास व्हिडिओ सामायिक केला आहे.
अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांचा खास व्हिडीओ समाज माध्यमांवर सामायिक केला. या व्हिडीओत जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांची गर्दी दिसत आहे. त्यानंतर बंगल्याचे गेट उघडले जाते आणि तिथे अमिताभ बच्चन येतात. बिग बींना पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. या व्हिडीओला अमिताभ बच्चन यांनी कॅप्शन दिलं,’जे येतात त्यांच्यासाठी खूप प्रेम.. मी आज जे आहे, त्यांच्यामुळेच आहे.’
लवकरच बिग बी ‘प्रोजेक्ट के’ या आगामी चित्रपटात दिसणार आहेत. यात त्यांच्यासोबत अभिनेता प्रभास आणि दीपिका पादुकोण हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत.