जय महाराष्ट्र न्यूज, रायगड
होळीनंतर थंडी ओसरून उन्हाळा सुरू होतो. पण यंदा उन्हाचा तडाखा आधीच सुरू झाला असून पुढील ४८ तासांत तर मुंबई व उपनगरात तसेच रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हा प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबईत बुधवारी कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसवर पोहोचले. ५२ वर्षांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात मुंबईत ३९.६ अंश से. एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद झाली होती.
मुंबईसह राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात कमालीची वाढ झाली आहे. मुंबईतील कमाल तापमान बुधवारी ३८ अंश सेल्सिअसवर गेले होते. बुधवारी राज्यात सर्वाधिक तापमान रायगड जिल्ह्यातील भीरा येथे ४२ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले होते. अकोलामध्ये ३८ तर परभणी, नागपूर, वर्धा व यवतमाळमध्ये कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. पुढील चोवीस तासात मुंबईत आकाश निरभ्र राहिल, तर कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
ऐन शिमग्यामध्येच कोंकण उन्हाच्या उष्णतेने घायाळ झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रायगडामध्ये गेली दोन दिवस तापमानाने ४२ अंशाचा टप्पा गाठल्याने रायगडकरांच्या अंगाची लाही झाली आहे.एप्रिल आणि मे महीन्यांत जाणवणारी दाहकता आत्ताच जाणवू लागल्याने पुढील तीन महिन्यांत काय होणार असा प्रश्न रायगडकरांना पढला आहे. येणाऱ्या पुढील अठ्ठे चाळीस तासांत रायगडात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला असल्याने आत्ता आणखी दोन दिवस उन्हाचा तडाखा रायगडकरांना सोसावा लागणार आहे.
मागील अठ्ठेचाळीस तासांमध्ये किमान ३६ तर कमाल ४२ अशी तापमानाची नोंद कुलाबा वेध शाळेने नोंदविली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजेच ४२ इतके तापमान हे माणगांव तालुक्यातील भिरा गावात नोंदविण्यात आले आहे. गेल्या वर्षी भिरा येथे जगातील सर्वाधिक पैकी दुसऱ्या क्रमांकाचे तापमान मोजण्यात आले होते. हवामान विभागाच्या तज्ञानी भिरा गावाला भेट दिली होती यंदा महीनाभर आधीच राज्यातील सर्वाधिक तापमान भिरा मध्ये मोजण्यात आले आहे.
टाटा पॉवर्स या कंपनीचा विज निर्मिती कारखाना येथे असून या कारखान्यामध्येच तापमान मोजण्याचे यंत्र कुलाबा वेधशाळेच्या वतीने बसविण्यात आले आहे. वाढलेल्या तापमाना मुळे एरवी गजबजलेल्या सर्वच ठिकाणांवरती दिवसभर शुकशुकाट निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. रायगडातील या संपूर्ण परिस्थितीचा तापमानाची सर्वाधिक नोंद असलेल्या भिरा गावातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भारत गोरेगांवकर यांनी