एसटी बसने दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना भंडारा येथील एसटी डेपोत घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील बापलेकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना रात्री साडेसात वाजताच्या सुमारास भंडारा एसटी डेपोत घडली.
रोहित खेडकर आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा रौनक खेडकर अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. मृतक रोहित यांचा आरो प्लांटचा व्यवसाय असून ते भंडारा शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करतात. रिकामी झालेली पाण्याची कॅन आणण्यासाठी बापलेक दुचाकीने एसटी डेपोत गेले होते. याचवेळी एसटी बस रिव्हर्स घेत असाना हा अपघात घडला आहे.
अपघातच्या घटनेची माहिती मिळताच भंडाऱ्यातील शहरातील शेकडो नागरिक शासकीय रुग्णालय आणि एसटी डेपो परिसरात जमा झाले. रूग्णालय आणि एसटी डेपोत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून तपास केला जात आहे.