मुंबईत बेस्ट उपक्रमातील प्रलंबित मागण्या आणि बेस्टच्या खाजगीकरणाच्या विरोधात बेस्ट संयुक्त कृती कामगार समितीने अखेर संपाची हाक दिली आहे. या निर्णयामुळे बेस्टच्या सेवांवर मोठा परिणाम होत आहे. मात्र, बेस्ट वर्कर्स युनियन आणि श्रमिक उत्कर्ष सभा या प्रमुख कर्मचारी संघटनांनी या संपाला पाठिंबा न देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कामगार संघटनांमध्ये मतभेद स्पष्टपणे समोर आले आहेत.
दरम्यान, प्रशासनाने कर्मचाऱ्यांना रजा रद्द करण्याचे आदेश दिले असून, कोणत्याही प्रकारे संपात सहभागी होऊ नये असे निर्देशही जारी करण्यात आले आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
संपाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बेस्ट सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना प्रवासात तारेवरची कसरत करावी लागत आहे. संपाचा प्रत्यक्ष परिणाम किती होतो आणि बेस्ट सेवा कितपत सुरळीत राहते, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.