बंगळुरू: भारताच्या आयटी राजधानीत घडलेली एक हृदयद्रावक घटना सध्या संपूर्ण देशाला हादरवून सोडत आहे. अत्याधुनिक सुविधा, मोठी रुग्णालये आणि प्रगत वैद्यकीय सेवा असलेल्या बंगळुरूमध्ये एका तरुणाचा केवळ वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दक्षिण बंगळुरूतील बालाजी नगर परिसरात राहणारे 34 वर्षीय वेंकटरामणन हे पेशाने मेकॅनिक होते. काही दिवसांपूर्वी त्यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात येताच त्यांच्या पत्नीने क्षणाचाही विलंब न करता त्यांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, या संघर्षाची सुरुवात इथूनच झाली.
रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे पत्नीने पतीला दुचाकीवर बसवून जवळच्या रुग्णालयात नेलं. मात्र, तिथे डॉक्टर उपलब्ध नसल्याचं कारण देत कर्मचाऱ्यांनी उपचार करण्यास नकार दिला. गंभीर अवस्थेतील रुग्णाला पाहूनही कुठलीही पर्यायी मदत न दिल्यामुळे पत्नी पूर्णपणे हतबल झाली.
No Ambulance, No Help, No Humanity: A Death That Questions Bengaluru In a deeply disturbing incident, Bengaluru witnessed a tragic collapse of both emergency care and basic human compassion. Venkataramanan, a 34-year-old mechanic from South Bengaluru, suffered severe chest pain… pic.twitter.com/I7Eb0m65hn — Karnataka Portfolio (@karnatakaportf) December 16, 2025
पहिल्या रुग्णालयातून निराश होऊन तिने पतीला दुसऱ्या रुग्णालयात नेलं. तिथे ईसीजी तपासणी करण्यात आली आणि वेंकटरामणन यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचं स्पष्ट झालं. तरीही आश्चर्यकारक बाब म्हणजे, ना तातडीचे उपचार सुरू करण्यात आले, ना त्यांना पुढील रुग्णालयात पाठवण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली.
या दोन्ही ठिकाणी नकार मिळाल्यानंतरही पत्नीने हार मानली नाही. पतीचा जीव वाचवण्याच्या आशेने तिने तिसऱ्या रुग्णालयाकडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रवासादरम्यान दुचाकीचा अपघात झाला. दोघेही रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले.
या क्षणांचे सीसीटीव्ही फुटेज पाहणाऱ्यांचे मन सुन्न करणारे आहे. पत्नी रडत-रडत, हात जोडून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांकडे मदतीची याचना करताना दिसते. मात्र, अनेक वाहनं थांबली नाहीत. अखेर एका कॅब चालकाने मानवतेचं दर्शन घडवत दोघांना रुग्णालयात पोहोचवलं. परंतु, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी वेंकटरामणन यांना मृत घोषित केलं.
या घटनेनंतर आरोग्य यंत्रणेतील उदासीनता, आपत्कालीन सेवांची कमतरता आणि समाजातील माणुसकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. वेंकटरामणन यांच्या पश्चात पाच वर्षांचा मुलगा, अवघ्या दीड वर्षांची मुलगी आणि वृद्ध आई असा परिवार आहे. या अपार दुःखातही कुटुंबाने मोठं मन दाखवत वेंकटरामणन यांचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही घटना केवळ एक अपघात नसून, ती आपल्या आरोग्य व्यवस्थेचं भयावह वास्तव समोर आणणारी आहे. वेळेत उपचार मिळाले असते, तर कदाचित आज एका कुटुंबाचा आधार जिवंत असता हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोळत आहे.