जय महाराष्ट्र न्युज, मुंबई
आपल्या सौंदर्याने अनेकांना भुरळ घालणारी विश्वसुंदरी सोशल मीडियाच्या विश्वात पदार्पण करत आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर ऐश्वर्याने पदार्पण करावं अशी तिच्या लाखो चाहत्यांची इच्छा होती. अखेर ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रीय असणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. अभिषेक बच्चनसुद्धा सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी जोडून राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र, ऐश्वर्या राय बच्चन सोशल मीडियावर कुठेच दिसत नव्हती.
इन्स्टाग्राम हा सर्वाधिक लोकप्रिय फोटो शेअरिंग अॅप आहे. ‘कान’ फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर झळकण्याच्या एक दिवस आधीच म्हणजेच उद्या (शुक्रवारी) ऐश्वर्याचं अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू करण्यात येणार आहे. ऐश्वर्याने नेहमीच तिचं खासगी आयुष्य सोशल मीडियापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच आतापर्यंत तिने फेसबुक, ट्विटर किंवा इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू केलं नव्हतं. मात्र, आता इन्स्टाग्रामच्या माध्यमातून या विश्वसुंदरीने शेअर केलेले सुरेख फोटो चाहत्यांना पाहता येणार आहेत.