बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मित्रांसोबत झालेल्या किरकोळ वादातून आणि वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये दुर्लक्ष झाल्याच्या भावनेतून एका 24 वर्षीय तरुणाने टोकाचा निर्णय घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, तरुणाच्या अचानक जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ गावात राहणारा महेश भणगे हा तरुण काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. मित्रांसोबत झालेल्या वादानंतर त्याचं मनोबल खचलं होतं. विशेष म्हणजे, एका जवळच्या मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्याला आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. नेहमी मित्रांच्या कार्यक्रमात पुढाकार घेणाऱ्या महेशला या घटनेचा मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे.
या पार्श्वभूमीवर महेशने आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी व्हॉट्सॲप स्टेटसचा आधार घेतला. “मी एकटा पडलो आहे, माझं दुःख कोणाला सांगू?” अशा आशयाचा स्टेटस त्याने ठेवला होता. या स्टेटसमधून त्याच्या मनातील एकटेपणा आणि नैराश्य स्पष्ट होत होतं. मात्र, त्याच्या या अवस्थेकडे कुणाचं लक्ष गेलं नाही आणि काही तासांतच दुर्दैवी घटना घडली.
सायंकाळच्या सुमारास महेश घराच्या छतावर गेला. बराच वेळ तो खाली आला नाही म्हणून कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेने कुटुंबीय सुन्न झाले असून, घरातील लाडका मुलगा कायमचा निघून गेल्याची जाणीव त्यांना सहन होत नाहीये.
या प्रकरणातून पुन्हा एकदा तरुणांमध्ये वाढत चाललेल्या मानसिक तणावाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. छोट्या-छोट्या कारणांमुळे मनावर घेतले जाणारे ताण, एकटेपणाची भावना आणि संवादाचा अभाव यामुळे अशा घटना घडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या भावनांकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचं यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.
या घटनेनंतर स्थानिक पातळीवर शोक व्यक्त केला जात असून, कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरुणांनी मानसिक अडचणींना सामोरे जाताना कुटुंबीय, मित्र किंवा तज्ज्ञांची मदत घ्यावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.