बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील चिमुकल्या विद्यार्थिनीने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर संपूर्ण जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलं आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सात्रा येथील इयत्ता दुसरीत शिकणारी अनुजा हावळे हिने बीटीएस (भारत टॅलेंट सर्च) परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे तिची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे शैक्षणिक संशोधन आणि विविध वैज्ञानिक प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, इस्रोच्या शैक्षणिक दौऱ्यासाठी निवड होणारी अनुजा ही बीड जिल्ह्यातील पहिली विद्यार्थिनी ठरली आहे.अनुजा एका सामान्य शेतकरी कुटुंबातील असून, मर्यादित साधनसामग्री आणि प्रतिकूल परिस्थितीतही तिने अभ्यासात सातत्य ठेवत हे यश मिळवले आहे. तिच्या मेहनतीसोबतच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन यामुळे हे स्वप्न साकार झाले आहे. एवढ्या लहान वयात मिळालेल्या या यशामुळे अनुजाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
इस्रोच्या चार दिवसांच्या शैक्षणिक दौऱ्यात अनुजाला अंतराळ संशोधन, उपग्रह निर्मिती, वैज्ञानिक प्रयोग आणि आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी मिळणार आहे. देशातील नामवंत वैज्ञानिकांच्या कार्यपद्धतीचा जवळून अनुभव घेण्याची ही सुवर्णसंधी तिच्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या दौऱ्यामुळे विज्ञान आणि संशोधन क्षेत्राबद्दल तिची आवड अधिक वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. इस्रोच्या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी गावात आणि शाळेत अनुजाचा विशेष सत्कार करण्यात आला. शिक्षक, ग्रामस्थ, पालक आणि विविध मान्यवरांनी तिचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अनुजाच्या या यशामुळे केवळ तिच्या कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण बीड जिल्ह्याचा अभिमान वाढला आहे.