बीड: धार्मिक कार्याचा मुखवटा घालून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या आणि बँकांसह प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा बीडमध्ये पर्दाफाश झाला आहे. Anti-Terrorism Squad (ATS) ने केलेल्या सखोल तपासात ‘गुलजार-ए-रझा’ या बोगस ट्रस्टने तब्बल 4 कोटी 73 लाख 67 हजार रुपये निधी हडप केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चार विश्वस्तांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
एटीएसच्या छत्रपती सांभाजीनगर युनिटने केलेल्या तांत्रिक तपासात या ट्रस्टचे धक्कादायक कारनामे उघड झाले आहेत. या टोळीने चक्क अहिल्यानगर येथील ‘फैजान-ए-कन्झुल इमान’ या दुसऱ्याच संस्थेचा नोंदणी क्रमांक आपलाच असल्याचे भासवून Axis Bank च्या लातूर शाखेत पाच बनावट खाती उघडली. याच्याही पुढे जावून केंद्र सरकारच्या नीती आयोगच्या ‘दर्पण’ पोर्टलवरही बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून शासनाची दिशाभूल करण्यात आली.
धार्मिक कार्याचा बहाणा करून सोशल मीडिया आणि स्वतःच्या वेबसाईटच्या माध्यमातून देणग्या गोळा केल्या जात होत्या. मात्र, गोळा झालेला हा कोट्यवधींचा निधी समाजकार्यासाठी न वापरता विश्वस्तांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आयकर विभाग आणि वक्फ बोर्डाची फसवणूक करून या टोळीने आपली पाळेमुळे घट्ट रोवली होती, ज्याचा एटीएसने आता छडा लावला आहे.
या प्रकरणात एटीएसने इग्रान कलीम शेख (अंबाजोगाई), मुज्जमील नुर सय्यद (माजलगाव), अहमदउद्दीन कैसर काझी (केज) आणि तौफिक जावेद काझी (अंधेरी) या चार जणांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत.
बीड जिल्ह्यातील विविध एनजीओ आणि ट्रस्टची नियमित पडताळणी सुरू असतानाच या संस्थेच्या संशयास्पद व्यवहारांचा सुगावा लागला आणि त्यातूनच हा मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे.
सध्या एटीएसचे पथक या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे. या घोटाळ्याचे धागेदोरे आणखी कुठपर्यंत पसरले आहेत आणि यात अजून कोणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे. या कारवाईमुळे बीड जिल्ह्यातील इतर संशयास्पद संस्थांचे धाबे दणाणले असून, आगामी काळात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा: Shehbaz Sharif Arrest Warrant : पाकिस्तानच्या पंतप्रधानांना होणार अटक? वॉरंट जारी