Chhatrapati Sambhajinagar: ग्रामीण भागातून मधमाशा गायब; परागीकरण घटल्याने फळबागांच्या उत्पादनावर मोठा परिणाम, शेतकरी चिंतेत

ग्रामीण भागात मधमाशांची संख्या घटल्याने परागीकरणावर परिणाम होत असून फळबाग उत्पादन कमी झाले आहे.

Chhatrapati Sambhajinagar: ग्रामीण भागातून मधमाशा गायब; परागीकरण घटल्याने फळबागांच्या उत्पादनावर मोठा परिणाम, शेतकरी चिंतेत

विजय चिडे प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: ग्रामीण भागात एकेकाळी सहजपणे आढळणाऱ्या मधमाशा आता हळूहळू दुर्मिळ होत चालल्या आहेत. या घटत्या संख्येचा थेट परिणाम शेतीवर, विशेषतः फळबागांच्या उत्पादनावर होत असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पूर्वी झाडाझुडपांमध्ये नैसर्गिकरित्या तयार होणारी मधमाशांची मोहोळे मोठ्या प्रमाणावर दिसायची. मात्र, गेल्या काही वर्षांत ही मोहोळे कमी होत चालली आहेत. मधमाशा परागीकरणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याने त्यांच्या संख्येत झालेली घट पिकांच्या उत्पादनावर परिणाम करत आहे. फळबाग, भाजीपाला आणि तेलबिया पिकांसाठी मधमाशांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

विशेषतः आंबा, डाळिंब, मोसंबी आणि लिंबू यांसारख्या पिकांमध्ये परागीकरण योग्य प्रमाणात न झाल्यास फळधारणा कमी होते. परिणामी, उत्पादनात घट येते आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी उत्पादनात घट झाल्याची तक्रार व्यक्त केली आहे.

मधमाशांच्या घटत्या संख्येमागे अनेक कारणे समोर येत आहेत. शेतीमध्ये वाढत्या प्रमाणात वापरले जाणारे रासायनिक कीटकनाशक हे एक मोठे कारण मानले जात आहे. कीटकनाशकांच्या फवारणीमुळे मधमाशांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय बदलते हवामान, तापमानातील चढ-उतार आणि नैसर्गिक अधिवासाचा नाश हीदेखील कारणे या समस्येला कारणीभूत ठरत आहेत.

नैसर्गिक मोहोळे कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता कृत्रिम पद्धतीने मधमाशांचे पालन म्हणजेच बी-कीपिंगकडे वळावे लागत आहे. काही शेतकरी बाहेरून मधमाशांच्या पेट्या भाड्याने आणून परागीकरणाची प्रक्रिया पूर्ण करतात. मात्र, या पद्धतीमुळे उत्पादन खर्चात वाढ होत असून सर्व शेतकऱ्यांना हा पर्याय परवडत नाही.

केकत जळगाव येथील शेतकरी अजिनाथ बढे यांनी सांगितले की, “पूर्वी नैसर्गिक मोहोळांमुळे फळधारणा चांगली व्हायची. आता मधमाशा कमी झाल्याने उत्पादन घटले आहे. त्यातच कृत्रिम मधमाशा वापराव्या लागल्याने खर्च वाढतो आहे.”

तज्ज्ञांच्या मते, मधमाशांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी सांगितले की, कीटकनाशकांचा नियंत्रित वापर करणे आणि शेताच्या बांधावर फुलझाडांची लागवड करणे आवश्यक आहे. यामुळे मधमाशांना आकर्षित करता येईल आणि त्यांच्या संख्येत वाढ होऊ शकते.

याशिवाय, पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब केल्यासही या समस्येवर नियंत्रण मिळवता येईल. सेंद्रिय शेती, नैसर्गिक उपाययोजना आणि जैविक कीटकनाशकांचा वापर यामुळे मधमाशांचे संरक्षण होऊ शकते.

शेतकरी आणि तज्ज्ञांकडून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. मधमाशांचे संवर्धन आणि बी-कीपिंगला प्रोत्साहन देण्यासाठी ठोस धोरण राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अन्यथा भविष्यात फळबागांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मधमाशांची घट ही केवळ पर्यावरणीय समस्या नसून शेती आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित गंभीर मुद्दा बनत आहे. त्यामुळे या समस्येवर तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक ठरत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number