मुंबई: कालचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न पुसल्या जाणाऱ्या जखमेसारखा कोरला गेला आहे. मुंबईहून बारामतीच्या दिशेने झेपावलेल्या विमानाचा काही क्षणातच संपर्क तुटला आणि एका भीषण अपघाताने उभ्या महाराष्ट्राचे हृदय हेलावले. राज्याचे लोकप्रिय नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र पोरका झाला असतानाच, या अपघातात विमानातील अन्य चार जीवांचाही करुण अंत झाला. हा केवळ अपघात नव्हता, तर पाच हसत्या-खेळत्या कुटुंबांचा आधार हिरावून नेणारा काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग होता.
अजित पवार यांच्यासोबतच त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी आणि वैमानिक कॅप्टन सुमित कपूर व कॅप्टन शांभवी पाठक या सर्वांनी या दुर्घटनेत प्राण गमावले. कर्तव्य बजावताना या सर्वांवर काळाने झडप घातली. रात्री उशिरा विदीप जाधव यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथे साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण गावात भयाण शांतता पसरली असून गावच्या लाडक्या पुत्राला निरोप देताना प्रत्येक गावकरी ढसाढसा रडताना दिसत होता.
या अपघातातील हृदयद्रावक कहाणी ती म्हणजे पिंकी माळी हिची. अवघ्या तीन वर्षांपूर्वी जिचा संसार सुरू झाला होता, ती तिच्या कुटुंबाला सोडून गेली. पिंकीच्या निधनाची बातमी कळताच तिच्या माहेरी वरळीत आणि सासरी कळवा येथे दुःखाचा डोंगर कोसळला. पिंकीचे पार्थिव जेव्हा तिच्या सासरी कळव्यात आणले गेले, तेव्हा तिथल्या भिंतींनाही पाझर फुटला असेल इतकी गंभीर परिस्थिती होती. सोसायटीमधील रहिवाशांच्या मते, हे जोडपं इतकं मिळून-मिसळून राहायचं की त्यांचं कौतुक संपूर्ण परिसरात व्हायचं.
पिंकीच्या जाण्याने तिचा पती सोमकर याच्यावर जणू आभाळच फाटलं आहे. पत्नीच्या आवडीनिवडी जपणारा सोमकर त्यांच्या घरात फर्निचरचं काम करून घराचं स्वप्न सजवत होता. पण नियतीला हे सुख मान्य नव्हतं. स्वतःच्या पत्नीचं पार्थिव समोर पाहून सोमकरला अश्रू अनावर झाले, त्याने दिलेला तो टाहो उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं काळीज पिळवटून टाकणारा होता. ज्या हातांनी संसाराची स्वप्ने विणली, त्याच हातांनी आज अर्धांगिनीला अखेरचा निरोप द्यावा लागला.
पिंकीच्या वडिलांची शोक अवस्था तर शब्दांत वर्णन करण्यापलीकडे आहे. लेकीच्या सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या पित्याला लाडकीच्या पार्थिवाला खांदा द्यावा लागला. वरळी येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी झालेली गर्दी आणि वातावरणातील तो जडपणा या अपघाताची भीषणता सांगत होता. लवकरच पिंकीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. महाराष्ट्र एका बाजूला आपल्या नेत्याच्या निधनाने शोकाकुल असताना, या सामान्य कुटुंबांतील उद्ध्वस्त झालेली स्वप्ने मनाला चटका लावून जात आहेत.