इस्लामाबाद: बांग्लादेश आणि पाकिस्तान यांच्यात संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्याच्या हालचालींना वेग आला असून, दोन्ही देशांच्या हवाई दल प्रमुखांमध्ये संभाव्य लष्करी कराराबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे. या चर्चांमध्ये पाकिस्तानमध्ये तयार होणाऱ्या JF-17 Thunder या लढाऊ विमानांच्या बांग्लादेशला विक्रीचा मुद्दा केंद्रस्थानी होता, अशी माहिती Daily Star वृत्तपत्राने पाकिस्तानच्या लष्कराच्या हवाल्याने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बैठक इस्लामाबादमध्ये पार पडली. पाकिस्तानचे हवाई दल प्रमुख झहीर अहमद बाबर सिध्दू आणि बांग्लादेशचे हवाई दल प्रमुख हसन महमूद खान यांच्यात JF-17 Thunder या बहुउद्देशीय लढाऊ विमानांच्या खरेदीबाबत सविस्तर चर्चा झाली. हे विमान पाकिस्तान आणि चीन यांच्या संयुक्त सहकार्याने विकसित करण्यात आले आहे.
या चर्चेदरम्यान पाकिस्तानने बांग्लादेशला Super Mushshak प्रशिक्षण विमानांचा (Trainer Aircraft) जलद पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासोबतच संपूर्ण प्रशिक्षण व्यवस्था (Training Ecosystem) आणि दीर्घकालीन तांत्रिक सहाय्य (Long-term Support) देण्याबाबतही हमी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा: Pune News : पुण्यात निवडणूक रणधुमाळीत शिवसेना नेत्याच्या वाहनावर हल्ला; 'हे' कारण समोर
ही बैठक अशा वेळी झाली आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वी बांग्लादेशमधील पाकिस्तानचे उच्चायुक्त इमरान हैदरने ढाक्यातील स्टेट गेस्ट हाऊसमध्ये बांग्लादेशचे मुख्य सल्लागार प्रो. मोहम्मद युनूसची शिष्टाचार भेट घेतली होती. त्या भेटीत ढाका – कराची थेट विमानसेवा (Direct Flights) जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता असल्याचेही नमूद करण्यात आले होते.
या बैठकीत दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक आणि नागरी विमानसेवा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. त्याचबरोबर सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय देवाणघेवाणीला चालना देऊन द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला.
याआधी ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानच्या संयुक्त लष्कर प्रमुख समितीचे अध्यक्ष (CJCSC) जनरल साहिर शमशाद मिर्झा यानेही बांग्लादेशचे मुख्य सल्लागार प्रो. मोहम्मद युनूसची भेट घेतली होती. त्या भेटीत द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि संरक्षण सहकार्याच्या वाढत्या महत्त्वावर सविस्तर चर्चा झाली होती.
या सततच्या बैठका आणि चर्चांमधून बांग्लादेश – पाकिस्तान संबंध नव्या दिशेने जात असल्याचे संकेत मिळत असून, विशेषतः संरक्षण आणि विमानसेवा क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्य आगामी काळात अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.