बेंगळुरू (कर्नाटक): ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेंगळुरूतील एका सॉफ्टवेअर इंजिनियरने 1.85 लाखांचा महागडा स्मार्टफोन मागवला, पण डिलिव्हरीच्या वेळी बॉक्स उघडला असता आत मोबाईलऐवजी चक्क फरशीचा तुकडा सापडला. या "डिलिव्हरी घोटाळ्या"बाबत पीडिताने कुमारस्वामी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पीडित प्रेमानंद, हे वरिष्ठ तांत्रिक तज्ज्ञ असून त्यांनी दिवाळी सेलदरम्यान अमेझॉन अॅपवरून Samsung Galaxy Z Fold मोबाईल ऑर्डर केला होता. त्यांनी क्रेडिट कार्डद्वारे 1,85,000 रुपये भरले होते. ठरलेल्या तारखेला पार्सल मिळाल्यानंतर त्यांनी बॉक्स उघडला असता आत मोबाईलऐवजी टाइलचा तुकडा ठेवलेला पाहून ते थक्क झाले.
प्रेमानंद यांनी सांगितले की, डिलिव्हरी घेताना त्यांना काही संशय आला नव्हता, कारण बॉक्सचं वजन मोबाईलसारखंच होतं. मात्र, त्यांनी सावधगिरी बाळगत बॉक्स उघडतानाचा पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. हा व्हिडिओ आणि खरेदीचे कागदपत्रे सध्या पोलिस तपासात महत्त्वाचे पुरावे ठरत आहेत.
हेही वाचा: IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महिला वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारताचा विक्रमी विजय
प्रेमानंद यांनी त्वरित डिलिव्हरी बॉयशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय सायबर रिपोर्टिंग पोर्टलवर आणि अमेझॉन कस्टमर केअरकडे 19 ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली. कंपनीने हा प्रकार गंभीरतेने घेत प्रेमानंद यांचे संपूर्ण पैसे परत केले आहेत.
पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली असून डिलिव्हरी चेनमध्ये नेमका घोटाळा कोठे झाला हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेनंतर ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. तज्ज्ञांनी ग्राहकांना सल्ला दिला आहे की, महागड्या वस्तूंची डिलिव्हरी घेताना सीलबंद बॉक्स उघडतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा, जेणेकरून अशा फसवणुकीच्या घटनांमध्ये पुरावा उपलब्ध राहील.