पुणे: खुनाच्या आरोपाखाली जेलची हवा खाणारा आणि हातात बेड्या असलेल्या बंडू आंदेकर याने शनिवारी पुण्याच्या राजकारणात जी 'एन्ट्री' केली, ती पाहून कायद्याची भीती नेमकी कुणाला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महापालिका निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी भवानी पेठेत आलेल्या बंडू आंदेकरने न्यायालयाच्या अटींना पायदळी तुडवत जो काही 'हाय-व्होल्टेज ड्रामा' केला, त्याने पुणे पोलीस आणि निवडणूक प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
कोर्टाच्या अटी धाब्यावर, आंदेकरांचा 'बुलंद' आवाज!
न्यायालयाने मेहेरबानी दाखवत आंदेकरला अर्ज भरण्याची मुभा दिली खरी, पण सोबत "मिरवणूक आणि घोषणाबाजी नको" असा सज्जड दमही भरला होता. मात्र, बंडू आंदेकरला या नियमांची जणू काही काळजीच नव्हती. कार्यालयात शिरताना "मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही" अशा गर्जना करत त्याने स्वतःला 'लोकशाहीचा कैवारी' ठरवण्याचा अजब प्रयत्न केला. बेड्या घातलेल्या हातातून विजयोत्सवाच्या आविर्भावात घोषणाबाजी करणे, हा प्रशासनाच्या तोंडावर मारलेला टोलाच असल्याची चर्चा आता रंगली आहे.
एन्ट्री 'भारी', पण अर्ज अर्धवटच
ज्या आक्रमकतेने आंदेकर कार्यालयात घुसला, त्याच वेगाने त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. आंदेकरने सादर केलेला उमेदवारी अर्ज तांत्रिकदृष्ट्या इतका 'पोकळ' निघाला की निवडणूक अधिकारी कल्याण पांढरे यांनी तो स्वीकारण्यास चक्क नकार दिला. अर्जातील अर्धे रकाने रिकामे ठेवून नेमकी कसली निवडणूक लढवायला आंदेकर निघालेत? असा खोचक सवाल आता उपस्थित केला जात आहे. "नेकी का काम, आंदेकर का नाम" म्हणणाऱ्यांना एक अर्ज नीट भरता येऊ नये, ही पुणेकरांसाठी मोठीच चर्चेची बाब ठरली आहे.
केवळ राजकीय पुनर्वसनाचा प्रयत्न?
पोलीस सुरक्षेत राहूनही ज्या प्रकारे नियमांचे उल्लंघन झाले, त्याने पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता सोमवारी पुन्हा एकदा हा 'नाट्यमय' प्रकार पाहायला मिळणार आहे. मात्र, यावेळी तरी आंदेकर कायद्याचा मान राखणार की पुन्हा एकदा 'बेड्यां'नाच भूषण मानून स्टंटबाजी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.