जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची सुरुवात होते, ती बालभारतीने. या बालभारती पुस्तकांची नक्कल करुन अनेकजण स्वत:चे नाव वापरुन पुस्तक प्रकाशित करतात. या खासगी प्रकाशकांवर आता चांगलाच चाप बसणार आहे. बालभारती आपल्या पुस्तकांवर कॉपीराईट घेणार आहे. या खासगी प्रकाशकांना आता बालभारतीला पैसे दिल्याशिवाय त्यांची पुस्तके बाजारात आणणे कठीण होणार आहे. राज्यातील शालेय शिक्षणाच्या सर्व पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीची जबाबदारी बालभारती या सरकारी संस्थेची आहे.
पूर्वापार चालत आलेल्या बालभारतीला टक्कर देण्यासाठी बाजारात अनेक खासगी प्रकाशके उपलब्ध झाली आहेत. ही प्रकाशके बालभारतीचा मजकूर वापरुन त्यात थोडा फेरबदल करून ती पुस्तके प्रकाशित करत आणि त्यातून पैसे कमवत. त्यानंतर त्यावर कॉपीराईट्स असल्याचा दावा देखील करत. यातून बालभारतीला कोणत्याही प्रकारचा नफा होत नसे.
राज्य शासनाने बालभारतीच्या पुस्तकांवर कॉपीराइट घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार या पुस्तकातील कोणताही मजूकर वापरायचा असल्यास प्रकाशकांना बालभारतीची परवानगी घेणे आवश्यक असेल. या निर्णयामुळे शिक्षणक्षेत्रातील बालभारतीच्या पुस्तकाचे स्थान अबाधित राहील.