महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर असून त्यांनी आज रामलल्लाचे दर्शन घेतले असून नवीन राम मंदिराच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली आहे. बाळासाहेबांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले आहे आणि तारीख विचारणाऱ्यांना मोदींनी घरी बसवले, असे एकनाथ शिंदे म्हणाले. राम मंदिराला ज्यांनी विरोध केला, अशा विचारधारेच्या पक्षांसोबत उद्धव ठाकरेंनी सरकार बनवले. मात्र, आम्ही ही चूक 7-8 महिन्यापूर्वी दुरुस्त केली, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
‘बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होतंय’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अयोध्येत राम मंदिर बनावे हे बाळासाहेब ठाकरे व लाखो रामभक्तांचे स्वप्न होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. भाजप आणि शिवसेनेचे विचार एकच आहे. मात्र, काही जण जाणीवपूर्वक दोन्ही पक्षांत मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
काहींना आमच्या अयोध्या दौऱ्याचा त्रास
काही जणांना हिंदुत्वाची अॅलर्जी आहे. त्यामुळेच ते आमच्या अयोध्या दौऱ्यावर टीका करत आहेत, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिले आहे. पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात रावणराज्य असल्याची टीका काही जण करत आहेत. महाराष्ट्रात साधू-संतांची हत्या झाली ते काय रामराज्य होते का?, असा सवाल एकनाथ शिंदेंनी केला.