जय महाराष्ट्र वेब न्यूज, नवी दिल्ली
एकेकाळी भाजपमध्ये पण आता काँग्रेसमध्ये असणारे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणं चांगलंच महागात पडत आहे. या शपथविधी समारंभात सिद्धू यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुखांचीही गळाभेट घेतली होती. या गळाभेटीबद्दल सिद्धू यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे.
बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये सिद्धू यांच्या या गळाभेटीविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
एवढंच नव्हे, तर आग्र्यामध्ये राष्ट्रीय बजरंग दलाच्या एका नेत्याने सिद्धू यांचं शीर कलम करण्यासंदर्भात घोषणाही केली आहे.
आग्रा येथील बजरंग दलाचा नेता संजय जाट याने सिद्धू यांचं शीर कापून आणणाऱ्याला 5 लाख रुपयांचं इनाम जाहीर केलंय.
यासंदर्भात घोषणा करणारा संजय जाट याने सोशल मिडियावर व्हायरल केला आहे.

सिद्धूचं वर्तन हे देशद्रोही आहे. तो आपल्या शीख गुरूंची शिकवण विसरलेला दिसतोय. अनेक भारतीय सैनिकांच्या मृत्यूला जबाबदार असणा-या पाकिस्तानी लष्करप्रमुखांना सिद्धू कसं काय आलिंगन देऊ शकतो? असा सवाल करत सिद्धू यांच्या अशा वर्तणुकीमुळे शहीद जवानांचा अपमान झाला आहे. देशरक्षणासाठी आपले प्राण गमावणा-या सैनिकांच्या कुटुंबांच्या भावना या कृत्याने दुखावल्या गेल्याचंही त्याने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. याच व्हिडिओमध्ये 5 लाखांचा चेक दाखवत सिद्धू यांचे शीर कापून आपल्याकडे घेऊन येणा-याला 5 लाखांचा चेक देण्यात येईल, असं या नेत्याने जाहीर केलं आहे.