रशियामध्ये सध्या वॅगनर ग्रुप या सैनिकांच्या समूहाने केलेल्या बंडामुळे वातावरण तापलं आहे. यावर प्रतिक्रिया देत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हा देशद्रोह असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी वॅगनर ग्रुपला निर्वाणीचा इशाराही दिला आहे.
पुतीन यांनी या सशस्त्र उठावाला देशद्रोह म्हटले आहे. वॅगनरने जो आपल्या पाठीत खंजीर खुपसला आहे, त्याची शिक्षा त्यांना नक्कीच मिळेल. रशियाच्या रक्षणासाठी जे करता येईल, ते मी करेल. तसेच, रोस्तोव-ऑन-डॉन शहरातील परिस्थिती सांभाळण्यासाठी निर्णायक कारवाई करण्यात येईल, असंही पुतीन यावेळी म्हणाले. वॅगनर सेनेचा प्रमुख येवगेनी प्रिगोझिन याने हे शहर आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे.
काय आहे प्रकरण?
वॅगनर ग्रुप हा एक भाडोत्री सैनिकांचा समूह आहे, जो रशियाच्या सरकारसाठी काम करतो. युक्रेन युद्धासाठीदेखील रशियाने याच सैनिकांना पाचारण केलं होतं. मात्र, आता या ग्रुपने रशियाविरुद्ध सशस्त्र उठाव केला आहे. त्यामुळे रशियामध्ये मोठं अंतर्गत युद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, वॅगनरच्या सैनिकांनी मॉस्कोच्या ५०० किलोमीटर दक्षिणेला असलेल्या वोरोनिश शहरातील सर्व आर्मी पोस्टवर ताबा मिळवला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्र्यांना पदावरुन हटवल्यामुळे हा उठाव झाल्याचं म्हटलं जात आहे.