शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी निधन झाले. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. आणि न्युमोनियाच्या उपचारांदरम्यान वयाच्या शंभरीत त्यांची प्राणज्योत मालवली. बाबासाहेबांच्या जाण्याने पुण्यासह उभ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाल्यानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पद्मविभूण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची हानी झाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले, ‘ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेले त्यांचे व्यक्तिमत्व होते. लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे. दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो.’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला आहे. अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यानी बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे साहित्य, नाट्यक्षेत्राशी संबंधित असणारे अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे श्रद्धांजली वाहिली आहे.