पुणे : कोरेगाव पार्क जमीन प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवली असताना, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी पार्थ पवार आणि पवार कुटुंबावर अतिशय तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत थेटपणे म्हटलं की, “पार्थ पवारांच्या गंडलेल्या घोटाळ्यावर मुळशी पॅटर्न 2 वर आधारित चित्रपट बनावा ‘पवार पॅटर्न बारामती’!” हाके म्हणाले, “1800 कोटींची महार वतनाची जागा 300 कोटीत लाटण्याचं काम पार्थ पवारने केलं. आई वडीलांकडून मुलं संस्कार शिकत असतात. पार्थ पवार दोन तीन वर्षांचे होते. तेव्हा अजित पवार व सुनेत्रा पवारांनी बारामतीच्या सोनगावमधील 3 एकर महार वतन लाटले आणि पार्थ पवारच्या नावे केले अशी पत्रकार परिषद बहुजन नेते काळुराम चौधरी यांनी केली म्हणजे बारा खडी शिकायच्या वयात सातबारा फिरवण्याची कला पार्थ पवारांना शिकवण्यात आली.”
ते पुढे म्हणाले, “बापाने 70 हजार कोटी पचवले साधी ढेकर दिली नाही. पार्थ पवार 1500 कोटींच्या घोटाळ्यात सापडले. ‘नया है वह’ म्हणत त्यांना सोडूनच दिले जाईल. नवा जमिन घोटाळा करताना पार्थ पवारांनी जुन्या चुका करु नयेत. एक लाख रुपयांच्या भागभांडवलाच्या कंपनीच्या माध्यमातून 300 कोटींचा व्यवहार करू नये. शेकडो कोटींचा व्यवहार 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करू नये. सरकारी खात्याची जमीन खासगी कंपनीकडे घेताना अधिकची काळजी घ्यावी.”
ते उपरोधाने लिहीत म्हणाले, “भविष्यात जर घोटाळे करायचेच असतील तर छोट्या महार वतनांच्या जमिनी सोडून मोठ्या जागांकडे लक्ष द्यावं. मरीन ड्राईव्ह, ताज हॉटेल, मलबार हिल्स, विधानभवन या ठिकाणांचा विचार करावा. किरकोळ जमिनींमध्ये वेळ घालवू नका.” हाके यांनी पवार कुटुंबाच्या ‘परंपरागत घोटाळ्यांवर’ भाष्य करताना म्हटलं, “प्रत्येकाकडे काही ना काही कला असते, पण पवारांच्या हातात तर जमिनी गायब करण्याची जादूची कांडीच आहे. त्याचं व्यवस्थित प्रशिक्षण पार्थ पवारांनी घ्यावं. भविष्यात 15 ते 20 हजार कोटींच्या जमिनींचा घोटाळा करावा."
ते पुढे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेची शिखरं गाठली ती दलित, मुस्लीम, ओबीसी आणि उपेक्षित घटकांच्या नरडीवर टाच ठेवून. पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे की, आजही सरंजामी पद्धतीचं राजकारण करणाऱ्यांच्या हाती राज्याची सत्ता आहे. पार्थ पवारांनी महार वतनाची जमीन कंपनीच्या नावावर केली, पण त्या जमिनीतील खऱ्या मालकांना उचलून आणलं का? किती लोकांच्या अन्नात माती कालवत हा व्यवहार उभा आहे? याचं सत्य महाराष्ट्राला कधीच कळणार नाही.” लक्ष्मण हाके यांची पार्थ पवार यांच्यावर आधारित ही फेसबुक पोस्ट सोशियल मेडियावर व्हायरल होत असून यावर अनेकांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.