आईची व्याख्या आपल्याला कधीही एका शब्दात करता येत नाही. पण अनेकदा आईला साथ देणाऱ्या मुलांचंदेखील कौतुकास्पद असतं. सध्या अशीच एक माय लेकीची जोडी सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. परभणीची रहिवासी असलेल्या एका महिलेची, जी आज आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी संघर्ष करत आहे. रोज सकाळी सकाळी साडेसहा वाजता एक आई आपल्या तीन वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन ऑटो रिक्षा चालवण्यासाठी घराबाहेर पडते.
indiaculturalhub च्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये कोमल गायकवाड यांचा व्हिडीओ दिसत आहे. यामध्ये आलेल्या माहीतीनुसार, 2018 मध्ये लग्न झाल्यानंतर त्या पतीसोबत कल्याणमध्ये राहायला आल्या. येथे त्या गृहिणी म्हणून राहात होत्या, तर त्यांचे पती ऑटो रिक्षा चालवत होते. त्याच काळात त्यांच्या पतींनी त्यांनाही ऑटो चालवायला शिकवले. 2022 साली त्यांना तेजू नावाची मुलगी झाली. त्यानंतर त्यांचे पती बाहेर जातो असं सांगून घराबाहेर पडले ते कधी परतलेच नाहीत. आता मुलीला एकटं कसं सांभाळायचं असा प्रश्न पडला. मात्र त्यांनी हार मानली नाही.
घर चालवण्यासाठी त्यांनी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. त्यांना सिक्युरिटी गार्डची नोकरीही मिळाली. मात्र मुलीची काळजी घेण्यासाठी कोणीच नसल्याने ती नोकरी करणे कठीण होत होते. त्याचवेळी मोठा निर्णय घेत त्यानी रिक्षा चालवण्याचे ठरवले.त्यांनी एक ऑटो भाड्याने घेतली आणि मुलीला सोबत घेऊन काम सुरू केले.
सुरुवातीला त्यांनी ऑटोच्या मागे मुलीसाठी एक छोटा बिछाना तयार केला होता. पण प्रवासी बसल्यानंतर मुलगी घाबरून रडू लागायची. नंतर त्यांनी आपल्या शेजारीच मुलीसाठी एक छोटी सीट बसवून घेतली. एकदा एका प्रवाशाने या गोड मायलेकींचा एक व्हिडीओ शेअर केला आणि बघता बघता तो क्षणात व्हायरल झाला. “आपल्या मुलीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण द्यायचे. मी दहावीनंतर पुढे शिकू शकले नाही, पण माझ्या मुलीला मला मिळू न शकलेले शिक्षण नक्की देणार”, असंही त्या म्हणाल्या.